1990 च्या दशकात क्रिकेट मोठ्या प्रमाणावर बदललं. आज चाळीशीत असलेली पिढी या घटनेची साक्षीदार आहे. त्याआधी देखील क्रिकेट आपल्याकडे लोकप्रिय होतंच पण त्या दशकात क्रिकेटने कात टाकली. त्या दशकाच्या सुरुवातीलाच आपली अर्थव्यवस्था बदलत चालली होती. आपण आपली अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली आणि देशोदेशींचे विविध ब्रँड्स आपल्याकडे दाखल झाले. ते जणू आपल्या रोजच्या व्यवहाराचे भाग बनत गेले. याच सुमारास आपल्या दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये देखील बदल घडू लागले. भारतात स्टार स्पोर्ट्स, ईएसपीएनसारख्या परदेशी वाहिन्या आल्या. देशोदेशीचे खेळ आपल्याला या वाहिन्यांवर दिसू लागले. आपला पिंड क्रिकेटचा होता, त्यामुळे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका देशांमधील सामने आपल्याला घरबसल्या बघता येऊ लागले. परदेशी वाहिन्यांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ होती. त्यातच सचिन तेंडुलकर नामक खेळाडूने क्रिकेटविश्वावर राज्य करायला सुरुवात केली होती. एक ब्रँड म्हणून तो देखील उदयास येत होता. भारतीयांची क्रिकेटची आवड, आपली लोकसंख्या, आणि बदलत जाणारा क्रिकेटचा खेळ यामुळे खेळाची ब्रँड व्हॅल्यू देखील वाढत चालली होती. 2003-04 च्या सुमारास सुरु झालेल्या टी-20 क्रिकेटने यामध्ये भरच घातली. पुढे 2007 चा विश्वचषक आणि त्यापाठोपाठ सुरु झालेल्या आयपीएल या क्रिकेटच्या जगातील सर्वात मोठ्या लीगने सर्व परिमाणे ओलांडत ‘क्रिकेट ब्रँड‘ च्या जगात आपला डंका वाजवायला सुरुवात केलीच. आज आयपीएलचा 18 वा मोसम मोठ्या झोकात पार पडतो आहे, आणि जगभरातील खेळांच्या दुनियेत या लीगने मोठी भरारी मारली आहे.
आयपीएलची दुनिया काही वेगळीच आहे. 2008 साली या स्पर्धेची सुरुवात झाली तेव्हा 5-10 वर्षांमध्ये तिचे काय होईल हे कोणालाच ठाऊक नव्हते. किंबहुना भारतीय खेळांच्या इतिहासात असे काहीतरी पहिल्यांदाच घडत होते. फुटबॉल किंवा बास्केटबॉल मधल्या लिग्सना मोठा इतिहास आहे, पण त्या त्या देशातील, त्या त्या खेळाचा चाहता देखील वेगळा आहे. बीसीसीआय साठी देखील हा सुरुवातीचा काळ खडतर ठरला असणार. पण आयपीएल उभी राहिली. अनेक वाद झाले, अनेक अडचणी आल्या, असंख्य आरोप झाले तरीही आयपीएल सारखी लीग अजूनही भक्कमपणे उभी आहे. एका रिपोर्टप्रमाणे 2008 साली जेव्हा ही स्पर्धा सुरु झाली तेव्हा या स्पर्धेची ब्रँड व्हॅल्यू साधारण 110 कोटी रुपये होती, पण आज 18 वर्षानंतर याच स्पर्धेची ब्रँड व्हॅल्यू साधारण 1200 कोटी रुपये आहे. म्हणजेच गेल्या 18 वर्षांमध्ये या स्पर्धेची ब्रँड व्हॅल्यू कैक कोटी रुपयांनी वाढलेली दिसते. अर्थातच हे आकडे सामान्य माणसांच्या आकलनापलीकडील आहेत. पण आयपीएल सारखा भारतीय ब्रँड मोठा दिमाखात उभा आहे, नव्हे अजूनही विस्तारतो आहे यामध्येच आपल्यातला सामान्य भारतीय आणि क्रिकेटप्रेमी खुश असेल.
आयपीएल सुरु झालं तेव्हा त्याच्याकडे अनेक खेळाडूंनी ‘पेड हॉलिडे‘ म्हणून बघितलं. दोन महिने ‘प्रदर्शनीय क्रिकेट‘ खेळून, बॅगेत करोडो रुपये घेऊन घरी जायचं असा काहीसा होरा होता. पण पुढे जाऊन त्या स्पर्धेची व्याप्ती आणि त्याचे गांभीर्य लक्षात येऊ लागले. पुढे आयपीएल हा ‘सिरीयस बिझनेस‘ आहे हे लक्षात आल्यानंतर खेळाडू देखील त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघू लागले. एकीकडे चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्ससारखे संघ मोठे होऊ लागले होते, तर दुसरीकडे पंजाब, हैदराबाद, दिल्लीसारख्या संघांनी आपल्या संघांची नावे बदलून आपले ब्रॅण्ड्स वेगळ्या स्वरूपात आयपीएलच्या बाजारात उतरवले. लीग बरोबरच आता हे संघ देखील मोठे होऊ लागले होते. या प्रत्येक संघाचे फॅन्स, त्यांचे चाहते यांची एक वेगळीच ‘आर्मी‘ तयार होऊ लागली होती. मैदानावर खेळणारे अकरा आणि मैदानाबाहेर लढणारे करोडो चाहते यांनी देखील ब्रॅण्ड्सना मोठे करायला सुरुवात केली. या फॅन्समध्ये असलेली अहमहिका आता मोठ्या प्रमाणावर दिसू लागली होती. कित्येकवेळा त्या चढाओढीने विचित्र, गंभीर स्वरूप देखील धारण केले. प्रतिस्पर्धी संघातील दिग्गज खेळाडूंना, मग तो आपल्या देशाचा प्रतिनिधी आहे हे देखील विसरून, हिणवायला सुरुवात झाली. आपलाच खेळाडू मोठा, त्यामुळे त्याचा जयघोष करणे, दुसऱ्या संघाच्या खेळाडूचा जमेल तितका अपमान करणे या गोष्टी सर्रास दिसू लागल्या. म्हणतात ना, ‘बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ‘. अगदी त्याचप्रमाणे या सर्व संघांनी आणि आयपीएलने देखील हे सर्व खेळीमेळीच्या वातावरणात स्वीकारलं. याचा एक फायदा असा झाला की आयपीएल हा ब्रँड म्हणून अजूनच मोठा होत गेला, आणि त्याचबरोबर हे आयपीएल संघ देखील.
आयपीएलच्या यशामुळे अनेक खेळाडूंचे देखील ब्रँड्स होऊ लागले. भारतात क्रिकेटपटूंना सुरुवातीपासूनच देवत्व दिलं गेलं होतं, पण आयपीएलनंतर या देवत्वाचे वेगळे परिणाम दिसू लागले. प्रत्येक मोठ्या खेळाडूचे फॅन फॉलोवर्स आणि त्यांची सेना, यामुळे हे खेळाडू आणखीनच मोठे भासू लागले. काही खेळाडूंनी क्रिकेट देवाशी प्रतारणा केली नाही, पण काही मात्र या देवत्वाचा टेम्भा मिरवीत राहिले. देशासाठी न खेळता, आपल्या आयपीएल संघांसाठी जास्त वेळ देणे, क्रिकेटच्या इतर दोन फॉरमॅट्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे, देशांतर्गत क्रिकेटला पूर्णपणे तिलांजली देणे हे प्रकार सुरु झाले आणि क्रिकेटचा आत्मा हरवला. अर्थात यासाठी आपण प्रेक्षक देखील जबाबदार आहोतच. एखादा खेळाडू मध्यप्रदेश किंवा महाराष्ट्र रणजी संघाचा नसून तो दिल्ली
कॅपिटल्स किंवा चेन्नई सुपर किंग्सचा आहे हे सांगण्यात आपण आनंद मानू लागलो. आयपीएल हा ब्रँड जसजसा मोठा होऊ लागला तसतसा भारतीय संघात येण्याचा हा महामार्ग देखील मोठा होत होता. दुर्दैवाने अनेक खेळाडूंनी त्या मार्गावरून भारतीय संघात प्रवेश केला खरा, पण नंतर त्याच मार्गाचे गोडवे गायला सुरु केले. हे एका अर्थाने आयपीएलचे यश होते. अगदी कोरोना काळात देखील आयपीएल स्पर्धा घडवून आणण्यासाठी बोर्डापासून सगळ्यांनी जिकिरीचे प्रयत्न केले. आयपीएलचे अर्थकारण, हा उद्योग मोठा तर झालाच आहे, पण हा ब्रँड त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा झाला आहे.
आज आयपीएल जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. आयपीएलच्या यशाने हुरळून जाऊन अनेक बोर्डांनी आपापल्या लीग्स सुरु केल्या. त्यातील काही रडतखडत सुरु आहेत तर काही बंद देखील पडल्या. आज आयपीएलचे बिझनेस मॉडेल अनेक विद्यापीठांमध्ये शिकवले जाते. 1928 मध्ये सुरु झालेल्या आपल्या क्रिकेट बोर्डाला हे बिझनेस मॉडेल आचरणात आणायला अनेक वर्षे गेली. आजच्या घडीला तरी आयपीएल स्पर्धेला तोड नाही, ही अशीच सुरु राहणार आहे. आयपीएल ही एक स्पर्धा नसून हा ब्रँड आहे आणि तो ब्रँड जसा मोठा होईल तसेच भारतीय क्रिकेट देखील मोठे होणार यात शंका नाही.
– कौस्तुभ चाटे









