वेर्णा पोलिसांची कारवाई, टोळीत विविध राज्यांतील दहा युवकांचा समावेश
वास्को : आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजीत गुंतलेल्या टोळीला जेरबंद करण्यास वेर्णा पोलिसांना यश आले. मुरगाव तालुक्यातील कासांवली आरोशी येथील एका घरात गुरूवारी रात्री छापा टाकून ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत वेर्णा पोलिसांनीं दहा जणांना अटक केलेली असून छत्तीसगड, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, ओरीसा व राजस्थानमधील युवकांचा या टोळीत समावेश आहे. पोलिसांनी या सट्टेबाजी प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये नितीन सिंग (31), सचिन सिंग (24), सौरभ देशपांडे (26), सनी जैसवाल (31), सत्रेंद्र कुमार सिंग (27), सुनील कुमार राय (27), मितेश प्रधान (23), नंद किशोर साहु (32), दलिप सिंग (24) व किशन सिंग या विविध राज्यातील युवकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून दहा लाख रूपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोसी येथील एका घरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा बाजार चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरूवारी रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक सलीम शेख व पोलीस निरीक्षक डायगो ग्रासिएस यांच्या मार्गदर्शनाखाली वेणा पोलिसांनी ही धाड घातली. या धाडीत वेगवेगळ्या राज्यांतील दहा युवक पोलिसांच्या तावडीत सापडले. एका घरातील बंद खोलीत ते सट्टा बाजार चालवत होते. कोलकाता नाईट रायडर विरूद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी तेजीत असताना पोलिसांनी या घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी त्या टोळीकडून 31 मोबाईल फोन्स, 7 लॅपटॉप, तीन इंटरनेट राऊटर व इतर इलेक्ट्रॉनिक जप्त केले. त्यांच्याकडून जप्त केलेल्या एकूण ऐवजाची किंमत दहा लाख रूपये आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दहा युवकांपैकी दोघे युवक ओरीसा राज्यातील पोलिसांच्या रडारवर होते. त्या राज्यातील एका गुन्ह्यात दोघांचा समावेश असून वेर्णा पोलिसांनी ओरीसा पोलिसाशी संपर्क साधलेला आहे. या दोघांना न्यायालयीय प्रक्रियेनंतर ओरीसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. सलीम शेख व डायगो ग्रासिएस यांच्या मार्गदर्शनाखाली वेर्णा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.









