मुंबईपाठोपाठ राजस्थाननेही बदलला कर्णधार संजू सॅमसन दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांना मुकणार
वृत्तसंस्था/जयपूर
आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार आहे. मात्र त्याआधी राजस्थान रॉयल्सने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सप्रमाणेच राजस्थान रॉयल्सनेही पहिल्या 3 सामन्यांसाठी कर्णधार बदलला आहे. राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन दुखापतीतून पूर्णपणे फिट न झाल्याने टीम मॅनेजमेंटने पहिल्या 3 सामन्यांसाठी रियान परागकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. राजस्थान या हंगामातील आपला पहिला सामना 23 मार्चला सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाने सांगितले, यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये, संघ व्यवस्थापनाने सुरुवातीच्या सामन्यादरम्यान रियान परागला संघाची कमान देण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा परिस्थितीत, 23 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रियान पहिल्यांदाच राजस्थानची जबाबदारी सांभाळेल. यानंतर, राजस्थान संघ परागच्या नेतृत्वाखाली 26 मार्च रोजी गतविजेत्या केकेआर आणि 30 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळेल. दरम्यान, नियमित कर्णधार कर्णधार संजू सॅमसन दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. यामुळे राजस्थानने मोठा निर्णय घेत कर्णधार बदलला आहे. सॅमसन राजस्थानच्या कॅम्पमध्ये सामील झाला आहे. पण दुखापतीमुळे तो यष्टीरक्षण करताना दिसणार नाही. पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर केवळ संजूच कर्णधार म्हणून पुनरागमन करेल, असेही संघ व्यवस्थापनाने यावेळी स्पष्ट केले.
रियान प्रथमच कॅप्टन
रियान पराग याची आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ असणार आहे. रियानला कॅप्टन्सीचा अनुभव नाही. त्यामुळे रियानसाठी हा नवा अनुभव असणार आहे. पहिल्या 3 सामन्यांत रियानचा कस लागणार आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पहिल्या 3 सामन्यांसाठी राजस्थान रॉयल्स संघ :
रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महीश थीक्षाना, वनिंदु हसरंगा, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय सिंह, नितीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, फझलहक फारूकी, युद्धवीर सिंह चरक, वैभव सूर्यवंशी, अशोक शर्मा आणि कुणाल राठोड.









