वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूची राजधानी चेन्नई नजीक असणाऱ्या थिरुपूर नामक गावातील अरुलमिगू कंदस्वामी मंदिराच्या दानपेटीत एका भक्ताचा आयफोन पडल्याने वाद निर्माण झाला आहे. दानपेटीत तो पडल्याने आता तो मंदिराची मालमत्ता झाला आहे, असे मंदिर व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. या युवकाने आयफोन पडल्यानंतर तो परत मिळविण्यासाठी व्यवस्थापनाशी संपर्क केला. तथापि, त्याच्या पदरी निराशा पडली. व्यवस्थापनाने आयफोन परत देण्यास नकार दिला. नियमानुसार दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू मंदिराच्या मालकीची होते, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मात्र, हा फोन चुकून दानपेटीत पडला, असे युवकाचे म्हणणे आहे.
नियमानुसार आयफोन परत देता येणार नाही. तथापि, त्यातील सीमकार्ड परत दिले जाऊ शकते. तसेच भाविक युवक या फोनमधील डाटा डाऊनलोड करुन घेऊ शकतो, असे प्रतिपादन व्यवस्थापनाने केले. या युवकाचे नाव दिनेश असे आहे. तो दानपेटीत अर्पण करण्यासाठी शर्टच्या खिशातून पैसे काढत असताना चुकून त्याचा आयफोनच दानपेटीत पडला. ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली आहे. दानपेटी उंचावर असल्याने त्याला हात घालून फोन काढता आला नव्हता. दानपेटी 2 महिन्यांमधून एकदा उघडली जात असल्याने तो शनिवारी 20 डिसेंबरला पुन्हा मंदिरात गेला. पण आयफोन देण्यास व्यवस्थापनाने नकार दिल्याने आता हे प्रकरण न्यायालयात जाऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.









