अॅपलचे समभाग अहवालानंतर घसरले : आयफोन विक्रीही 5 टक्क्यांनी प्रभावीत होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चीनमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयफोनवर बंदी असल्याच्या वृत्तानंतर अॅपलचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी घसरले. गेल्या दोन दिवसांत कंपनीच्या समभागांमध्ये सुमारे 6 टक्के घसरण झाली आहे. गुरुवारी, ते 5.35 किंवा 2.92 टक्क्यांनी खाली येत 177.56 डॉलरवर बंद झाले.
अॅपलची तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ चीन आहे. गेल्या वर्षीच्या 394 अब्ज डॉलरच्या एकूण महसुलात त्याचा 18 टक्के वाटा होता. अॅपलची बहुतांश उत्पादनेही चीनमध्येच तयार होतात. सरकारी कर्मचाऱ्यांवर बंदी घातल्याने चीनमध्ये आयफोनच्या विक्रीत 5 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.
चीनमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी घातल्याचे दोन दिवसांपूर्वी वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले होते. चीनने अमेरिकन कंपनी अॅपलसह इतर देशांच्या उपकरणांच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी फक्त सरकारी अधिकाऱ्यांना लागू असेल. ही उपकरणे कार्यालयात आणू नका किंवा कामासाठी वापरू नका, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
चीन सरकारने अधिकाऱ्यांना देशात बनवलेले फोन वापरण्यास सांगितले आहे. चीनने अॅपलशिवाय अन्य कोणत्याही फोन उत्पादक कंपनीचे नाव दिलेले नाही. याबाबत अॅपलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचबरोबर चीन सरकारने या बंदीबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. तीन महिन्यांपूर्वी रशियाने अमेरिकेवर आयफोन हेरल्याचा आरोप केला होता. मात्र, अॅपलने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर आता चीन सरकारने आयफोन बंदीचे पाऊल उचलले आहे.
भारताला होणार फायदा
बँक ऑफ अमेरिकाच्या अहवालानुसार, भारत सरकारची उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम अॅपलला देशात त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. बँक ऑफ अमेरिकाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, सरकारची पीएलआय योजना केवळ अॅपललाच नाही तर भारतालाही मदत करू शकते. भू-राजकीय तणाव आणि कोरोना महामारीनंतर अॅपलसह इतर अमेरिकन टेक दिग्गज चीनबाहेरही त्यांच्या उत्पादन सुविधांचा विस्तार करण्यासाठी काम करत आहेत.









