वृत्तसंस्था/ मुंबई
इपॅक प्रीफॅब टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचा आयपीओ 24 सप्टेंबर रोजी बाजारात गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना 26 सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 504 कोटी रुपयांची उभारणी करणार असून यानंतर कंपनीचे बाजार भांडवल 2049.22 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते. कंपनीने आयपीओकरिता समभागाची किंमत 194 ते 204 रुपये प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. या अंतर्गत 300कोटी रुपयांचे 1.47 कोटी नवे ताजे समभाग आणि 204 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल अंतर्गत समभाग सादर केले जाणार आहेत.
गुंतवणूकदारांना 73 समभागांसाठी बोली लावता येणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांना कमीत कमी 14892 रुपये गुंतवावे लागणार आहेत. या इशू मधील 50 टक्के हिस्सेदारी पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदार, 15 टक्के उच्च उत्पन्न व्यक्ती आणि 35 टक्के हिस्सेदारी रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. कंपनीचे समभाग शेअर बाजारामध्ये 1 ऑक्टोबरला सुचीबद्ध होण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे.
कंपनीचा परिचय : ग्रेटर नोएडामध्ये या कंपनीची स्थापना 1999 मध्ये झाली होती. अभियांत्रिकी, फॅब्रिकेशन आणि प्रकल्प व्यवस्थापनासंदर्भातील तज्ञ कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे.









