आयओएचे पदाधिकारी अभिताभ शर्मा यांची माहिती
पणजी, मडगाव : गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीबद्दल आम्ही समाधानी असल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अधिकारी अमिताभ शर्मा यांनी सांगितले. काल मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्यासमवेत क्रीडामंत्री गोविंद गावडे, आयओएचे सदस्य सहदेव यादव, हरपाल सिंग, भुपिंदर सिंग बाजवा, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालिका गीता नागवेकर व क्रीडा संचालक रोहित कदम यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यातच घेण्याबाबत आयओए अनुकूल आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील साधनसुविधांचा आढावा घेण्यासाठी आयओएचे शिष्टमंडळ गोव्यात आले होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी गोवा सज्ज असल्याचे आम्हाला वाटते असे अभिताभ शर्मा यावेळी म्हणाले. गोव्यात स्पर्धेच्या आयोजनासाठी साधनसुविधांची कमतरता नाही. ही स्पर्धा गोवा निश्चितच यशस्वी करून दाखवेल, असेही शर्मा यावेळी म्हणाले.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार स्पर्धा
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन गोव्यात होणार असून यासाठी 37 खेळांचा सहभाग निश्चित आहे. याशिवाय नवीन खेळ सामावून घेण्यासाठी त्यांची तांत्रिक बाजू तपासली जाईल. गोव्याच्या पारंपरिक लगोरी खेळाचाही समावेश करण्यात येणार आहे. गोव्यात सायकलिंग क्रीडाप्रकारासाठी आवश्यक वॅलोड्रॉम नाही. सायकलिंग व नेमबाजी हे क्रीडा प्रकार गोव्याबाहेरील राज्यात आयोजित करण्यात येणार आहेत.
राज्य प्रशासन कुठेच मागे नाही
क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या कामाबाबत राज्य प्रशासन कुठेच मागे नसल्याचे दिसून आले आहे. काही तांत्रिक बाबीबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांचे पालनही येत्या दोन महिन्यात होणार असल्याचे शर्मा म्हणाले. फोंडा क्रीडा संकुलात वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी नियोजित स्थळ होते, मात्र आता पाहणी केल्यानंतर हा क्रीडाप्रकार येथे शक्य होणार नसल्याचे दिसून आले आहे. हा क्रीडा प्रकार आता दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणार असल्याचे शर्मा यावेळी म्हणाले.
दहा कि.मी.च्या आत निवासव्यवस्था
स्पर्धेदरम्यान, अॅथलेट्सच्या राहण्याचा तसेच त्यांना सरावाच्या बाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. स्पर्धेच्या ठिकाणाहून 10 किलोमीटर अंतराच्या आत अॅथलेट्सच्या राहण्याची सोय करण्यात येणार आहे. आयोजनाची पाहणी करण्यासाठी आयओएचे शिष्टमंडळ वेळोवेळी गोव्यात येणार असून कामाचा आढावा घेणार असल्याचे अभिताभ शर्मा म्हणाले.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात स्पर्धा : क्रीडामंत्री
गोव्यात या स्पर्धेचे आयोजन बहुदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याचे यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले. शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन झाले तर त्यानंतर इफ्फी, दिवाळी व ख्रिसमस आहे. तसेच अॅथलेट्सना दिवाळीपूर्वी आपआपल्या राज्यात पोहचायचे आहे. हा सर्व विचार लक्षात घेऊन स्पर्धा ऑक्टोबच्या शेवटच्या आठवड्यात घेणे उचित ठरेल, असे क्रीडामंत्री गावडे म्हणाले. गोव्यात 16 दिवस या स्पर्धेचे आयोजन होणार असून यासाठी अॅथलेट्स व अधिकारी मिळून सुमारे 15 हजार लोक राज्यात येणार आहेत.









