वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाक क्रिकेट मंडळाने येत्या ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या 2023 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीकोनातून पाकचे माजी कर्णधार इंझमाम उल हक यांची पुरुषांच्या वरिष्ठ राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही आगामी स्पर्धा भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
इंझमाम उल हक यांनी यापूर्वी म्हणजे 2016 ते 2019 या कालावधीत पाकच्या निवड समिती प्रमुखपदाची सूत्रे सांभाळली होती. इंझमामच्या प्रमुख निवड समिती पदाच्या कारकिर्दीत पाक संघाने 2017 साली आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पाक क्रिकेट संघाला या आगामी स्पर्धेसाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन इंझमामकडून मिळू शकेल, अशी खात्री पीसीबीची झाल्याने इंझमामकडे पुन्हा निवड समिती प्रमुखपदाची सूत्रे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाक आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने होणार आहे. सदर स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होईल. या दोन्ही आगामी स्पर्धांमुळे पाक संघासमोर महत्त्वाचा कालावधी ठरणार आहे. निवड समिती प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आता इंझमाम उल हक यांच्याकडे अफगाणबरोबर होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी पाक संघाची घोषणा इंझमाम करतील. अफगाण आणि पाक यांच्यातील ही वनडे मालिका 22 ऑगस्टपासून लंकेत खेळविली जाणार आहे. त्यानंतर इंझमाम उल हक यांनी यापूर्वी निवड समिती प्रमुखपदाची सूत्रे हाताळताना 2019 सालातील आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाक संघाची निवड केली होती आणि पाकने त्या स्पर्धेत पाचवे स्थान मिळविले होते. 2019 च्या स्पर्धेमध्ये पाकचे उपांत्यफेरीत प्रवेश मिळविण्याची संधी थोडक्यात हुकली होती. न्यूझीलंड आणि पाक यांच्यात उपांत्यफेरीसाठी चुरस निर्माण झाली होती आणि न्यूझीलंडने सरस धावसरासरीच्या जोरावर पाकला मागे टाकत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला होता. इंझमामची निवड समिती प्रमुखपदी नियुक्ती झाल्याची घोषणा पीसीबीने आपल्या ट्विटरवर केली आहे.
पाकच्या क्रिकेट इतिहासामध्ये इंझमाम उल हक यांनी तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ख्याती मिळविली आहे. इंझमामने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 120 कसोटीत 49.60 धावांच्या सरासरीने 8830 धावा जमविताना 25 शतके आणि 46 अर्धशतके नोंदविली आहेत. 329 ही इंझमामची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. पाकतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंझमाम तिसऱ्या स्थानावर आहे. इंझमामने वनडे क्रिकेट प्रकारात 378 सामन्यात 11739 धावा जमविल्या असून त्यात 10 शतके आणि 83 अर्धशतकांचा समावेश आहे. इंझमामने केवळ एकमेव टी-20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळताना नाबाद 11 धावा जमविल्या होत्या. 1991 ते 2007 या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत इंझमामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 499 सामन्यात 20580 धावा जमविल्या असून त्यामध्ये 35 शतके आणि 129 अर्धशतकांचा समावेश आहे. 1992 साली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या इमरान खानच्या नेतृत्त्वाखालील पाक संघामध्ये इंझमामचा समावेश होता.









