माजी लष्करप्रमुख नरवणे यांचा थेट चीनवर रोख : बंडखोर संघटनांना ड्रॅगनकडून मोठे पाठबळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूर हिंसाचारावरून देशात खळबळ उडाली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावरून बराच गदारोळ सुरू असतानाच माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) एम. एम. नरवणे यांनी मणिपूर हिंसाचारात विदेशी शक्तींचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा थेट रोख चीन या शेजारी देशाकडे असून त्यांनी स्पष्टपणे ‘ड्रॅगन’चा नामोल्लेखही केला आहे. दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित राष्ट्रीय सुरक्षाविषयक चर्चेदरम्यान त्यांनी मणिपूर हिंसाचारावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
मणिपूर हिंसाचारात परदेशी यंत्रणांचा सहभाग असण्याची शक्मयता नाकारता येत नाही. सीमावर्ती राज्यांमधील अस्थिरता देशाच्या एकूण राष्ट्रीय सुरक्षेसाठी चांगली नाही. मणिपूरमधील बंडखोर संघटनांना चीनकडून करण्यात येत असलेल्या मदतीचाही त्यांनी उल्लेख केला. एम. एम. नरवणे यांनी याप्रसंगी हिंसाचारावर नियंत्रण आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले. हा हिंसाचार थोपवण्याची जबाबदारी असलेले लोक आणि यंत्रणा त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी काम करत आहेत. मात्र, आतापर्यंतची परिस्थिती पाहता यात परदेशी एजन्सींचा सहभाग नाकारता येत नाही. विदेशी शक्तींचा या हिंसाचारात नक्कीच सहभाग असल्याचे नमूद करताना चीन अनेक वर्षांपासून तेथील बंडखोर संघटनांना मदत करत असल्याचे ते म्हणाले. आताही ही मदत पुरविण्याचा सिलसिला सुरू असल्यामुळे हिंसाचाराला पायबंद बसवण्यात अडचणी येत असल्याचे ते म्हणाले.
अमली पदार्थांची तस्करीही जोरात
मणिपूरसह इतर सीमावर्ती राज्यांमधून अमली पदार्थांची तस्करी फार पूर्वीपासून होत आहे. गेल्या काही वर्षांत जप्त केलेल्या अमली पदार्थांचे प्रमाण वाढले आहे. गोल्डन ट्रँगलपासून (थायलंड, म्यानमार आणि लाओसच्या सीमा जिथे मिळतात ते क्षेत्र) आम्ही थोड्याच अंतरावर आहोत. म्यानमारमध्ये नेहमीच अव्यवस्था आणि लष्करी राजवट राहिल्यामुळे अमली पदार्थांची तस्करी नेहमीच होत असते, असेही ते पुढे म्हणाले.