अध्याय सत्ताविसावा
जो भक्त स्वत:ला विसरून देवाची अनन्यभक्ती करत असतो त्याला ईश्वराचे सर्वव्यापी स्वरूप लक्षात येते. स्वत:चे अस्तित्व विसरल्याने तो आणि भगवंत एकरूप झालेले असतात. ह्याला अभेदभक्ती असे म्हणतात. अभेदभक्ती करणारा भक्त संतपदाला पोहोचलेला असतो. संतांच्याकडे अशी ताकद असते की, ते इतरांची पापे शोषून घेतात तरीही त्यांना ती बाधत नाहीत पण त्यांना शरण आलेला मात्र पाप विरहीत होतो. याच कारणासाठी देव व मानव त्याच्या पायी लागतात व भगवंतही त्याच्यापाशीच असतात. याप्रमाणे अभेद भावनेच्या भक्तापाशी सारी तीर्थे येऊन निर्दोष होतात. ते भक्तीचे माहेर होत.
संतांचे देवावर अत्यंत प्रेम असते देवालाही त्यांच्या निरपेक्ष प्रेमामुळे सुख होते. अभेदभक्ती करणारा भक्त देवाला प्रत्यक्षात पाहू शकतो. म्हणून तीच ‘उत्तम भक्ती’ होय. हे सर्व सांगत असताना, भगवंत भक्त आणि भक्ती ह्या त्यांच्या अत्यंत प्रिय विषयावर बोलण्यात अगदी गढून गेले. खरं म्हणजे भगवंत उद्धवाला पूजाविधीचे निरुपण सांगत आहेत पण अभेदभक्तीचा विषय निघाल्यावर, मूळ विषय बाजूलाच राहिला आणि भगवंत अभेदभक्ती आणि अभेद्भक्त ह्यावरच बोलत राहिले. मूळ विषय बाजूलाच राहिला आहे, ह्याची त्यांना पुसटशीही आठवणही राहिली नाही. देव निरूपण विसरले पण उद्धवाला अभेदभक्तीचा महिमा समजला. त्याचा त्याच्या मनावर खूपच प्रभाव पडला. त्याचा परिणाम होऊन तो आणि भगवंत एकरूप झाले.
आपण उद्धव आहोत हे तो विसरला आणि कृष्णालाही कृष्णपणा आठवेनासा झाला. अभेदभजनाच्या हर्षाने देव आणि भक्त एकच झाले. दोघेही स्तब्ध होऊन बसले व परमसुखी झाले. उद्धव हा देवगुरु बृह्स्पतींचा शिष्य असल्याने तो वास्तविक पाहता आत्मज्ञानाने परीपूर्ण होता. मग त्याने पूजाविधानाचा प्रश्न भगवंतांना करण्याचे कारण काय? अशी शंका मनात येणे साहजिकच आहे. याचं उत्तर असं की, आपण जर शंका विचारणे, प्रश्न करणे बंद केले तर भगवंत आता मी नि:शंक झालो असे समजून, निजधामास निघून जातील अशी भीती उद्धवाला वाटत होती आणि असे लगेच घडू नये म्हणून होतहोइतो भगवंताच्या वियोगाचा क्षण जेव्हढा जमेल तेव्हढा लांबवावा ह्या हेतूने तो निरनिराळे प्रश्न व शंका देवांना विचारत होता.
अर्थात उद्धव हा देवांचा लाडका भक्त असल्याने त्यानाही त्याचा विरह सहन होण्यासारखा नव्हताच! म्हणून त्याने आणखीन आणखीन प्रश्न विचारत राहून विरहाची घडी लांबवावी असे देवांच्याही मनात येत होते. भक्त आणि भगवंत यांच्या अलौकिक प्रेमाचे हे उदाहरण आहे. विरहाची घडी होतहोइतो लांबवावी ह्या एकमेव उद्देशाने भगवंत असा विचार करत होते की, यदाकदाचित उद्धवाला पुढे काय विचारावे असा प्रश्न पडला तर संभाषणात खंड पडू नये म्हणून भगवंत स्वत: पुढाकार घेऊन पूजाविधीची सविस्तर माहिती आपणहून उद्धवाला सांगत होते.
उपासनाकांडातील गुप्त ज्ञान, आगमोक्त पूजाविधान, वगैरे वेदाचा अर्थ आता ते सांगणार आहेत. ते म्हणाले, उद्धवा! नीट लक्ष दे. ह्यापुढील यथोक्त पूजाविधान तुला मी सांगतो. मी सांगितल्याप्रमाणे भक्ताने आपण आणि भगवंत एकच आहोत हा भाव मनात दृढ करावा. मग बाह्य पूजेकरिता प्रतिमेत आवाहन करावे. आपण प्रतिमेच्या समोर बसून आवाहनमुद्रा दाखवून माझी सारी चैतन्यशक्ती त्या प्रतिमेत आली आहे अशी भावना करावी. अशी भावना केली की, समोरील मूर्ती निर्जीव आहे असे यत्किंचितही मनात आणू नये. समोरील मूर्ती माझ्या चैतन्याने भारलेली आहे असेच मानावे. ह्यालाच मुख्य ‘आवाहन’ असं म्हणतात. आवाहन करणे म्हणजे अत्यंत आदराने व प्रेमाने बोलावणे. भक्ताच्या मनात माझ्याबद्दल असलेला आदर व प्रेम पाहून मी श्रीहरि भारावून जातो आणि माझ्या चैतन्यासह मूर्तीत प्रवेश करतो. म्हणून मी आधी सांगितल्याप्रमाणे आता ती मूर्ती निर्जीव न होता माझ्या चैतन्याने युक्त झालेली असते. ह्यालाच प्राणप्रतिष्ठा करणे असेही म्हणतात. तो विधी पूर्ण होण्यासाठी गुरूच्या मुखातून मिळालेल्या निर्दोष मंत्राने मूर्तीच्या सर्वांगावर, आगमशास्त्राsक्त सर्व न्यास सावकाश करावेत.
क्रमश:








