बेळगाव : साधना क्रीडा संघ बेळगाव, कर्नाटक राज्य खो-खो संघटना व बेळगाव जिल्हा उपसंघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या साखळी खो-खो स्पर्धेचे शनिवार दि. 4 फेब्रुवारी रोजी धर्मवीर संभाजी मैदान, महाद्वार रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून निमंत्रित संघ बेळगावला दाखल झाले आहेत.
धर्मवीर संभाजी मैदानावर आयोजित निमंत्रितांच्या आंतरराज्य खो-खो स्पर्धेत राज्यातील आठ नामवंत संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. ते आठ संघ दोन गटात विभागले गेले असून अ गटात डीवायईएस दावणगिरी, कावेरी कपिला सीएस टीएन पुरा, केएसपी बेंगळूर, अशोका सीएस चल्लकेरी तर ब गटात श्री एमव्ही भद्रावती, चामुंडेश्वरी सीएस म्हैसूर, महालिंगेश्वर सीएस कुंदरगी व साधना क्रीडा संघ बेळगाव या संघांचा समावेश आहे. वरील आठ संघात साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात येणार असून उद्घाटन दिवशी आठ साखळी सामने तर रविवारी चार साखळी सामने, उपांत्यफेरीचे सामने, तिसऱ्या क्रमांकाचा सामना व सायंकाळी अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. सदर स्पर्धा केकेएफआयच्या नियमानुसार खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी तांत्रिक कमिटी त्याचप्रमाणे पंच देखील बेंगळूरहून कर्नाटक खो-खो फेडरेशनच्या क्वॉलिफाईड पंचांना पाचारण करण्यात आले आहेत. सायंकाळी स्पर्धेचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून केकेएफआयचे उपाध्यक्ष व केएसकेकेएचे अध्यक्ष लोकेश्वर, माजी प्राचार्य एस. जी. मोरे, जीएसएस महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे, प्रकाश नंदिहळ्ळी, प्रकाश देसाई, दाजी भातकांडे, नेत्रावती भागवत आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या स्पर्धेचा लाभ खो-खो प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन साधना क्रीडा संघाचे अध्यक्ष व बुडा चेअरमन संजय बेळगावकर, सतीश बाचिकर, अशोक हलगेकर व विवेक पाटील यांनी केले आहे.









