चीनसमर्थक नेपाळी पंतप्रधान ओलींचा प्रस्ताव
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेपाळच्या दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे. ओली यांनी विदेश सचिव विक्रम मिस्त्राr यांच्यासोबत झालेल्या शिष्टाचार भेटीदरम्यान मोदींना नेपाळ दौऱ्यासाठी निमंत्रित केले आहे. पुष्पकमल दहल यांचे सरकार कोसळल्यावर मागील महिन्यातच ओली यांनी चौथ्यांदा नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.
केपी शर्मा ओली हे नेपाळच्या सर्वात प्रभावी राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. 2015 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. यानंतर 2018 आणि मग 2021 मध्ये त्यांनी पंतप्रधानपद मिळविले होते. ओली यांना चीनसमर्थक म्हणून ओळखले जाते. ओली हे सत्तेवर परतल्याने भारताच्या चिंता वाढल्या आहेत. तर दुसरीकडे ओली यांनी पंतप्रधान मोदींना नेपाळ दौऱ्याचे निमंत्रण दिल्याने दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये सकारात्मक सुधारणा होईल असे मानले जात आहे.
ओली यांचा चीनच्या दिशेने असणारा ओढा पाहता ते ड्रॅगनच्या बीआरआय उपक्रमात सामील होण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु नेपाळमधील आघाडी सरकार पाहता ओली हे विदेश धोरणाप्रकरणी अत्यंत सावध भूमिका घेऊ पाहत असल्याचे मानले जात आहे. सरकार एक तटस्थ विदेश धोरण अंमलात आणणार असल्याचा दावा नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टी-युनिफाइड मार्क्सवादी लेनिनवादीकडून करण्यात आला आहे.









