सभापती रमेश तवडकर यांनी आयोजन समिती शिष्टमंडळासह घेतली भेट
प्रतिनिधी /काणकोण
काणकोणच्या आदर्श युवा संघातर्फे आयोजित 22 व्या लोकोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ाला यंदा भारताच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आले असून या लोकोत्सवाचे प्रमुख असलेले काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांच्यासहित लोकोत्सव आयोजन समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले आहे.
या शिष्टमंडळात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद खुटकर, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष दीपक करमलकर, भाजपाच्या एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, सभापतींचे ओएसडी उपासो गावकर, स्वीय सचिव राजेंद्र बोरकर यांचा समावेश होता. 1995 साली खोतीगाव-गावडोंगरीच्या युवकांना संघटित करून विद्यमान सभापती रमेश तवडकर यांनी आदर्श युवा संघाची स्थापना केली होती. लोकसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन, ग्रामीण संस्कृती, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना ही मूलतत्वे घेऊन पुढे आलेल्या आदर्श युवा संघातर्फे मागच्या 21 वर्षांपासून लोकोत्सवाचे आयोजन केले जात आहे.
आजवर या लोकोत्सवाला राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांची उपस्थिती लाभलेली असून यंदाच्या लोकोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ाला राष्ट्रपतींची उपस्थिती लाभल्यास ती एक पर्वणीच ठरणार आहे. याचवेळी या शिष्टमंडळाने लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांनाही लोकोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे.









