बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स 312 अंकांनी नुकसानीत : लार्सन अॅण्ड टुब्रोचे समभाग दबावात
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. बुधवारी भारतीय रिझर्व्ह बँकेची चलनदरवाढ संदर्भात बैठकीला प्रारंभ झाला आहे. परंतु या बैठकीच्या निर्णया अगोदरच बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली असल्याचे दिसून आले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक हे बुधवारी बाजार सुरु झाल्यानंतर अस्थिर झाले होते. यामुळे दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 312.53 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 78,271.28 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 42.95 अंकांच्या नुकसानी सोबत निर्देशांक 23,696.30 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील 30 पैकी 19 समभाग घसरणीत आणि 11 तेजीत राहिले आहेत. तर मुख्य कंपन्यांमध्ये निफ्टीमधील 25 समभाग हे नुकसानीत बंद झाले आहेत. तसेच एशियन पेन्ट्स, टायटन कंपनी, नेस्ले इंडिया, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि टाटा कंझ्युमर यांचा समावेश हा घसरणीत राहिला आहे. दुसऱ्या बाजूला ओएनजीसी, हिंडाल्को, अपोलो हॉस्पिटल आणि बीपीसीएल यांचे समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. बाजारात व्यापक कामगिरीत स्मॉलकॅपचे समभाग चमकले आहेत. तसेच निफ्टी स्मॉलकॅपचा निर्देशांक हा 1.85 टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. तर निफ्टी मिडकॅपचा निर्देशांक हा 0.68 टक्क्यांनी तेजीत राहिला.
आशियातील बाजारात मिळताजुळता कल
बुधवारच्या बाजारात आशियातील जपानचा निक्कोई 0.085 टक्के आणि कोरियाचा कॉस्पी 1.11 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. तर चीनचा शांघाय कम्पोजिटचा निर्देशांक 0.65 टक्क्यांनी घसरणीत राहिले. भारतीय बाजारात आजही काहीसा दबाव राहणार आहे. कारण उद्या होणाऱ्या पतधोरण बैठकीच्या निर्णयाकडे बाजाराची नजर राहणार आहे. यामुळे बाजाराची दिशा कशी निश्चित होणार हे पहावे लागणार असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे.









