मंत्री एम. बी. पाटील यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळ विदेश दौऱ्यावर : उद्योजकांशी चर्चा
बेंगळूर : जपानमधील होसोडा होल्डिंग्जने कर्नाटकात 882 कोटी रुपये गुंतवून सौर सेल उत्पादन प्रकल्प उभारण्याची ग्वाही दिली आहे, अशी माहिती राज्याचे अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली. टोंग थार एनर्जी सोल्यूशन्स (टीटीईएस) च्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. प्रारंभी टीटीईएसने या प्रकल्पासाठी 490 कोटी रु. खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत या योजनेसंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. टीटीईएस सोबतच्या भागीदारीमुळे होसोडा होल्डिंग्जने या योजनेतील गुंतवणुकीची रक्कम वाढविली आहे. यामुळे राज्यातील 500 जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मंत्री एम. बी. पाटील यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर आहे. तेथील कंपन्यांना कर्नाटकात भांडवल गुंतवणुकीसाठी ते आवाहन करत असून त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळत आहे. शुक्रवारी होसोडा होल्डिंग्जचे चेअरमन नाकामुरा सॅन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कंपनीने गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतला. क्रीडा साहित्य निर्मिती करणाऱ्या जपानमधील इनाबाटा कंपनीने देखील 2027 मध्ये कर्नाटकात गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. या कंपनीला आवश्यक जमीन देण्याकरिता भूसंपादन व संबंधित मंजुरी जलदगतीने देण्यात येतील. एकग्रेव्हिंग आणि डायकटींग टेक्नॉलॉजी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तेत्सुजिकावा कंपनीने राज्यातील आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार असल्याची माहिती राज्याज्या शिष्टमंडळाला दिली आहे. शिष्टमंडळात उद्योग खात्याचे मुख्य सचिव डॉ. एस. सेल्वकुमार, उद्योग खात्याच्या आयुक्त गुंजन कृष्ण व इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे.









