सप्टेंबरमध्ये 175 कोटीची गुंतवणूक: ऑगस्टमध्ये 1028 कोटींची गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
17 महिन्यांच्या कालावधीनंतर गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक घटली असून गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये 175 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
गोल्ड लिंकड ईटीएफमध्ये मागच्या महिन्यामध्ये 175.3 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ऑगस्टमध्ये ही गुंतवणूक 1028 कोटी रुपये इतकी झाली होती. जुलैमध्ये 456 कोटी रुपयांची गुंतवणूक गोल्ड ईटीएफमध्ये करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात 17 महिन्यानंतर गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक सर्वाधिक वाढलेली दिसून आली होती.
का होतेय घट
अमेरिकेमध्ये व्याजदरामध्ये सातत्याने वाढ होत असून महागाई दर अजूनही अपेक्षेपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे याचा परिणाम गुंतवणुकीवर दिसून येत आहे. सुरक्षित गुंतवणुकीच्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. ईटीएफमध्ये सलग तीन तिमाहीत विक्रीचा सिलसिला दिसला होता. एप्रिल ते जून तिमाहीमध्ये मात्र 298 कोटी रुपयांची गुंतवणूक यामध्ये झालेली पाहायला मिळाली.









