पीडब्ल्यूसी इंडियाच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॅलेंडर वर्षातील एप्रिल ते जूनच्या दुसऱया तिमाहीत स्टार्टअप्समधील गुंतवणूक 40 टक्के घटली आहे. सदरच्या कालावधीत 6.8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाल्याची माहिती पीडब्ल्यूसी इंडिया यांच्या अहवालात देण्यात आली आहे.
सदरच्या कालावधीत सरासरी 50 लाख डॉलर्सचा निधी स्टार्टअप्स कंपन्यांमध्ये गुंतवला गेला आहे. सलग तीन तिमाहीत 10 अब्ज डॉलर्सची उभारणी करण्यात आली होती. पण दुसऱया तिमाहीत त्यात 40 टक्के घट झाली. जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली सुस्ती, रशिया युक्रेन युद्ध, सर्वत्र वाढणारी महागाई ही प्रमुख कारणे गुंतवणूक घटण्यामागे सांगितली जात आहेत. येत्या काळात गुंतवणूक वाढू शकते.
चार वर्षात 122 स्टार्टअप कंपन्या
स्टार्टअप कंपन्यांच्या स्थापनेचा सिलसिला भारतात वाढत असून तो अजून वाढता वाढता वाढे याप्रमाणे राहणार आहे. आगामी 4 वर्षांच्या कालावधीत 122 नव्या स्टार्टअप कंपन्या अस्तित्वात येतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हुरुन रिसर्च इन्स्टिटय़ूट यांनी याबाबतचा अंदाज नुकताच मांडला आहे.
एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याच्या कंपन्या या युनिकॉर्न गटात मोडतात. 4 वर्षात युनिकॉर्न कंपन्यांची संख्या 200 पेक्षा अधिक दिसेल, असेही संस्थेने म्हटले आहे.









