आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांची मागणी
पणजी : राज्यात नोकऱ्या देताना त्या विकल्या जात असल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. आता तर नोकऱ्या विक्री भ्रष्टाचार प्रकरणात अनेकजणांच्या तक्रारी पोलिसात नोंद झालेल्या आहेत. या नोकऱ्या विक्री प्रकरणात सत्ताधारी पक्षातील अनेक राजकीय नेते असण्याचा संशय असल्याने या प्रकरणाची चौकशी ईडीमार्फत न करता, न्यायालयामार्फतच करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते अॅड. अमित पालेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली. पालेकर यांनी सांगितले की, आतापर्यंत ईडीमार्फत जी चौकशी प्रकरणे हाताळली गेली, त्यामध्ये सत्ताधाऱ्यांना झुकते माप देण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय ईडी ही भाजपची दुसरी एजन्सी असल्याचा लोकांमध्ये समज आहे. त्यामुळे राज्यातील नोकऱ्या विक्री प्रकरणात ईडीचा आधार घेतला तर या चौकशीतून काहीही समोर येणार नाही. ज्यांनी नोकऱ्या विक्रीसाठी पैशांचा आधार घेतला त्यांना सहीसलामत बाहेर काढण्याचेही काम होऊ शकते. म्हणून निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी समिती नेमूनच नोकऱ्यांच्या विक्री प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असेही पालेकर यांनी सांगितले. राज्यातील नोकऱ्या विक्री प्रकरणाने वातावरण ढवळून निघाले असल्यामुळे सध्याच्या सरकारावरील लोकांचा विश्वास उडत चालल्याचेही आप नेते पालेकर म्हणाले.









