45 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 40 हजार रु. हस्तगत
खानापूर : खानापूर पोलिसांकडून दोन चोऱ्यांचा तपास करून सहा आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 लाख 25 हजारांचे सोन्याचे दागिने तसेच 40 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले असून दागिने आणि रक्कम मालकाना परत देण्यात आली आहे. याबाबत खानापूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बेळगाव-हल्याळ बसमधून प्रवास करताना एका महिलेच्या पर्समधील 45 ग्रॅम सोन्याचे दागिने काही दिवसापूर्वी चोरीला गेले होते. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली होती. या चोरीचा तपास खानापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला होता. यात निता शंकर लोंडे, रुपाली रवि काळे, मेघा नामदेव जाधव या तीन महिला आरोपीना अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. आणि त्यांच्याकडील 45 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. यानंतर या तिन्ही आरोपीना खानापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. तसेच शहरातील स्टेट बँकेजवळ एका वृद्ध महिलेच्या पिशवीतील 40 हजार रुपये लांबविल्याची घटना घडली होती. याही चोरीचा छडा खानापूर पोलिसांनी लावला असून यात पूजा संदीप, निशा चिंटू सिशोदिया, गौरी संजय बनेरिया या तीन मध्य प्रदेशातील महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी 40 हजार रु. लांबवल्याचे कबूल केले होते. ही 40 हजार रक्कम जप्त करून ज्या महिलेचे 40 हजार रुपये लांबविले होते. तिला परत देण्यात आले आहेत. तर या तिन्ही आरोपीना न्यायालयासमोर हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. या चोरीच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक एल. वेणुगोपाळ, बैलहोंगल विभागाचे उपअधिक्षक रवि डी. नायक, तसेच खानापूर पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक, उपनिरीक्षक एम. गिरीश आणि चन्नबसव बबली यांनी तपास करून या चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.









