प्रतिनिधी/ बेळगाव
श्री विसर्जन मिरवणुकीवेळी एका तरुणावर चाकूहल्ला केल्याच्या आरोपावरून खडेबाजार पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली आहे. शनिवारी सीसीटीव्ही फुटेजवरून पाच जणांची चौकशी करण्यात आली आहे.
मंगळवार दि. 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्री खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील दोन ठिकाणी चाकूहल्ल्याची घटना घडली होती. विवेकानंद पाटील (वय 21) या तरुणावर चाकूहल्ला केल्याच्या आरोपावरून पाच संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
मिरवणुकीत झेंडे फिरविताना झालेल्या वादावादीनंतर तरुणावर चाकूहल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर यासंबंधी आणखी अधिक माहिती मिळणार आहे.









