बरेच महत्वाचे धागेदोरे लागले हाती : तीन खोल्या, टॉयलेट केले सीलबंद
प्रतिनिधी /म्हापसा
अभिनेत्री व भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या खून प्रकरणाची चौकशी करणाऱया सीबीआयचे पथक व फॉरेन्सिक पथकाने हणजूण येथील कर्लिज बार ऍण्ड रेस्टॉरंट बीच शॅक येथे कसून तपास सुरु ठेवला आहे. या तपासात त्यांच्या हाती अन्य काही धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एकूणच या प्रकरणाचा तपास गतिमान झाला आहे.
सीबीआयच्या पथकाने कर्लिजमधील अनेक कर्मचाऱयांची स्वतंत्रपणे चौकशी केली. तत्पूर्वी पथकाने हणजूण येथील ज्या हॉटेलात सोनाली यांचा मृतदेह आढळून आला होता, त्या ठिकाणची शनिवारी सुमारे 10 तास झडती घेतली होती. यावेळी काही कागदपत्रे जप्त केली होती. स्थानिक पोलीस अधिकारी तसेच सोनाली यांची ज्या इस्पितळात तपासणी केली गेली, तेथील डॉक्टरांसोबतही सीबीआयच्या पथकाने चर्चा केली आहे.
सीबीआय टीमने यापुर्वी वागातोर येथील द ग्रॅण्ड लिओनी रिसॉर्टवर जाऊन तपासकाम केले आहे. सोनाली फोगट व सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग हे तिघे ज्या तीन खोल्यांमध्ये राहत होते त्या तिन्ही खोल्यांमधील सामानासह त्या खोल्या सील केल्या आहेत. कर्लिज बारच्या ज्या टॉयलेटमध्ये सुधीर सांगवानने लपविलेला अमलीपदार्थ सापडला होता त्यालाही टाळे ठोकले आहे.









