आयबी पथक काठमांडू येथे जाणार : एसएसबीकडून मागविली माहिती
वृत्तसंस्था/ नोएडा
पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर ही आयएसआयची हस्तक आहे का प्रेयसी? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. उत्तरप्रदेश एटीएसने सीमा हैदरची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सीमाला तिचे काका आणि भाऊ पाकिस्तानी सैन्यात कार्यरत असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. सीमाचा कथित भारतीय पती सचिन आणि त्याच्या वडिलांना एटीएसने मंगळवारी सकाळी पुन्हा चौकशीसाठी नेले आहे. मुंबई पोलिसांना सीमाला पाकिस्तान परत पाठविण्याची आणि 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी मिळाल्यावर त्यांच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
सीमा स्वत:च्या 4 मुलांसोबत भारतात कशी दाखल झाली याबाबत विचारणा करत इंटेलिजेन्स ब्युरोने (आयबी) सीमा सुरक्षा दलाकडून (एसएसबी) अहवाल मागविला आहे. सीमा ही बिहारच्या सीतमाढी सीमेला ओलांडून नेपाळमार्गे भारतात दाखल झाली होती. या सीमेवर एसएसबी तैनात आहे. सीमा आणि तिच्या 4 मुलांकडे नेपाळचा पर्यटन व्हिसा असताना ते भारतात कसे पोहोचले? सुरक्षेत कुठे चूक झाली असे प्रश्न आयबीने एसएसबीला विचारले आहेत.
आयबीचे एक पथक या पूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी नेपाळला जाणार आहे. हे पथक सीमा आणि सचिनच्या जबाबांची पडताळणी करणार आहे. सीमाला 4 मुलांसमवेत नेपाळ सीमा ओलांडण्यास आणखी कुणाची मदत लाभली असल्याचा आयबीला संशय आहे.
तुरुंगवास का प्रत्यार्पण?
पुढील एक किंवा दोन दिवसांत केंद्रीय गृह मंत्रालय नोएडा पोलिसांकडून पत्र प्राप्त झाल्यावर पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क साधू शकते. यानंतर सीमा हैदराला पाकिस्तानात पाठविले जाण्याची शक्यता आहे. सीमा हेर निघाल्यास केवळ तिच्या चार मुलांना पाकिस्तानात पाठविले जाईल. तर सीमा आणि सचिन या दोघांचीही रवानगी तुरुंगात केली जाणार आहे. आयबीच्या इनपूटनुसार सीमाचे काका पाकिस्तानी सैन्यात अधिकारी आहेत, तर तिचा भाऊ पाकिस्तानी सैन्यात कार्यरत आहे. परंतु यापूर्वी सीमाने ही बाब नाकारली होती.
पाकिस्तानात घडामोडींना वेग
सीमासंबंधी पाकिस्तानात घडामोडींना वेग आला आहे. तेथील स्थानिक गट व्हिडिओ जारी करून सीमाला पाकिस्तान परत पाठविण्यात यावे असे म्हणत आहेत. या गटांनी तेथील अल्पसंख्याक समुदाय म्हणजेच हिंदूंना लक्ष्य करण्याची धमकी देखील दिली आहे. अशा स्थितीत भारतीय तपास यंत्रणा याप्रकरणी नरमाईची भूमिका घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. सीमाचे प्रकरण पाकिस्तानातील हिंदूंसाठी संकट ठरण्याची भीती देखील व्यक्त होत आहे. सीमा सातत्याने स्वत:च्या व्हिडिओंमध्ये पाकिस्तानात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचत आहे.
घराबाहेर सुरक्षा
पाकिस्तानात ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा गावात पोहोचलेली सीमा हैदर आता सेलिब्रिटी झाली आहे. अनेक ठिकाणांहून लोक केवळ तिला पाहण्यासाठी पोहोचत आहेत. तसेच त्यांच्या घराबाहेर प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी गर्दी केली आहे. सीमा या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधू लागली होती. तसेच तिने सोशल मीडियावर सचिन सोबत रील तयार करत शेअर करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या घराबाहेर जमलेल्या लोकांना आता हटविण्यात येत असून पोलिसांनी तेथे बंदोबस्त ठेवला आहे.









