नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बिहारचे माजी मुख्यमंत्री, चारा घोटाळय़ात शिक्षा भोगलेले आणि आता जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची सीबीआयकडून जमीनीच्या मोबदल्यात नोकरी (लँड फॉफ जॉब्ज) घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचीही याच प्रकरणात सोमवारी चौकशी करण्यात आली होती.
सीबीआयने लालू यादवांची तब्बल पाच तास कसून चौकशी केली. यासाठी सीबीआयने पाच अधिकाऱयांनी नियुक्ती केली होती. या अधिकाऱयांनी मंगळवारीं सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी लालू यादव यांच्या कन्या आणि राज्यसभा खासदार मिसा भारती यांच्या निवासस्थानी यादव यांची चौकशी केली. ते आजारी असल्याने त्यांना सीबीआयच्या मुख्यालयात बोलाविण्यात आले नव्हते.
कुटुंबसदस्यांविरोधात आरोपपत्र
लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि 14 जणांच्या विरोधात या घोटाळय़ाच्या संदर्भात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक, सीपीओ, तसेच अनेक उमेदवार यांच्यावर आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. लालू यादव यांच्या कन्येचाही त्यात समावेश आहे.
घोटाळय़ाचे स्वरुप
लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना अनेक तरुणांना रेल्वेत विविध पदांवर नोकऱया देण्यात आल्या. या नोकऱयांच्या मोबदल्यात लालू यादव आणि त्यांचे कुटुंबीय यांनी नोकरीं मिळविलेल्यांच्या जमीनी आणि भूखंड ताब्यात घेतले. काही भूखंड त्यांनी अशा प्रकारे अत्यल्प दरात कमावले. हे प्रकरण 2004 ते 2009 या कालखंडातील आहे. या काळात देशात मनमोहनसिंग यांचे सरकार होते आणि त्या सरकारमध्ये लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री होते. 2014 मध्ये केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर हे प्रकरण बाहेर आले. त्यानंतर संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगारी कारस्थान करणे, भ्रष्टाचार करणे आदी आरोप सादर करण्यात आले आहेत. सध्या हे प्रकरण दिल्लीच्यग्ना रोज ऍव्हेन्यू न्यायालयात असून पुढील सुनावणी 15 मार्चला आहे. लालू यादव व इतर आरोपींना या दिवशी न्यायालयात उपस्थित राहण्यासंबंधी नोटीस काढण्यात आली आहे.









