पुणे / प्रतिनिधी :
पुणे शहरात घातपाती कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या दोन दहशतवाद्यांकडून ड्रोन कॅमेऱ्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांची ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्याची तयारीत दहशतवादी असल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) असून, याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. तसेच संबंधित दहशतवाद्यांचा तपास कोथरूड पोलिसांकडून एटीएसकडे शनिवारी हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधित आरोपींवर बेकायदेशीर हालचाल प्रतिबंधक कायदा यूएपीएनुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे एनआयएच्या तपासात आढळून आले आहे. संबंधित आरोपी हे कोंढवा परिसरात राहण्यास होते. मात्र, त्यांनी कोंढवा येथील भाडय़ाच्या घरासोबतच हडपसर परिसरातील मगरपट्टा या ठिकाणीदेखील एक फ्लॅट भाडय़ाने घेतला असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित घरातून पोलिसांनी एक लॅपटॉप, एक मोबाईल तसेच महत्त्वपूर्ण अन्य साहित्य जप्त केले आहे. नेमके दुसरे घर भाडय़ाने कशाकरता घेतले, याबाबत तपास चौकशी यंत्रणा करत आहे. या दहशतवाद्यांचा पुण्यात कोठे वावर होता, याची माहिती घेण्यात येत असून, त्यांच्याबरोबर असलेल्या पसार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. कोथरुड भागातून दुचाकी चोरण्याच्या तयारीत मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय 24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) होते. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (वय 31) पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
इम्रान खान, युनूस साकी यांच्याकडून बनावट आधरकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱया रंगाच्या गोळय़ा, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकिट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुण्यात लष्कराचे दक्षिण मुख्यालय आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसह महत्त्वाच्या लष्करी, तसेच संशोधन संस्था आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्याच्या तयारीत दहशतवादी असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यादृष्टीने त्यांची चौकशी करण्यात येत आहे. खान आणि साकी यांच्याकडून पांढऱ्या रंगाच्या गोळय़ा जप्त करण्यात आल्या असून, गोळय़ा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षांपासून दहशतवादी कोंढवा भागात वास्तव्यास होते. घरमालकाने त्यांच्या भाडेकराराची नोंदणी केली नसल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
दहशतवादी सुफाशी संबंधित, जयपूरमध्ये स्फोट घडविण्याचा कट
पोलिसांनी घरझडतीत एक काडतूस जप्त केले असून, पिस्तूल सापडले नाही. साकी आणि खान आयसीस या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबधित आहेत. ते जयपूर येथे बाँबस्फोट घडविण्याच्या तयारीत होते. स्फोटके बाळगल्याप्रकरणी एनआयएने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ते पसार झाले होते.