इंदापूर-महाराष्ट्रमधून ट्रकसह चालकाला अटक : जिल्हा पोलीसप्रमुखांची माहिती
बेळगाव : महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व त्यांचे बंधू विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे सरकारी इनोव्हामधून बेंगळूरहून बेळगावला येताना अंबडगट्टी क्रॉसजवळ एका ट्रकने ठोकरल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. अपघातानंतर वाहनासह पलायन केलेल्या ट्रकचालकाचा तब्बल तीन महिन्यांनंतर शोध घेण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बुधवारी सायंकाळी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने तपास करून ट्रकचालकाचा शोध घेण्यात आला आहे. मधुकर कोंडीराम सोमवंशी (वय 65) राहणार तकरारवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे असे त्याचे नाव आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर ट्रकचालकाला अटक करून अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.
दि. 14 जानेवारी रोजी सकाळी केए 01, जीए 9777 क्रमांकाच्या सरकारी इनोव्हामधून बेंगळूरहून बेळगावला येताना मंत्र्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर जखमी झाल्या होत्या. वैद्यकीय उपचारानंतर त्यांना घरात विश्रांती घ्यावी लागली होती. मंत्र्यांच्या वाहनाला ठोकरणारा ट्रकचालक कोण? याचा उलगडा होत नव्हता. पोलिसांनी हिरेबागेवाडी टोलनाका व अंबडगट्टीजवळील हरियाणा ढाब्यामध्ये असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेऊन फुटेजच्या माध्यमातून अपघातग्रस्त ट्रकचा शोध घेतला आहे. एमएच 12 टीव्ही 9740 क्रमांकाच्या ट्रकने ठोकरल्याने हा अपघात घडला होता. विधिविज्ञान प्रयोगशाळेतील तज्ञांनी पाहणी करून दिलेल्या पुराव्यामुळे ट्रकचालकाचा शोध घेण्यात आला आहे.
सुरुवातीला मधुकर सोमवंशीला ट्रकसह ताब्यात घेऊन विधिविज्ञान प्रयोगासाठी ट्रक हुबळीला पाठविण्यात आला. ट्रकने मंत्र्यांच्या इनोव्हाला ठोकरल्यामुळे इनोव्हाचा रंग ट्रकला लागला होता. प्रयोगशाळेच्या अहवालात याच ट्रकने ठोकरल्यामुळे अपघात झाल्याचे उघडकीस आले होते. याबरोबरच आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल, अपघात घडला त्यादिवशी या परिसरातून मिळालेल्या मोबाईल टॉवरसंबंधीची माहिती आदींच्या आधारावर ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. त्याला जामीनही मंजूर झाला आहे. बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.









