ता. पं. अधिकाऱ्यांकडून चौकशी-पाहणी : दोषींवर कारवाई करण्याची मागणी : तक्रारीची घेतली दखल : ग्रा. पं. च्या गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी करणार
वार्ताहर /अगसगे
केदनुर ग्रामपंचायतमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये 2021 पासून आतापर्यंत गैरव्यवहार केला आहे, असे निवेदन जिल्हा पंचायतीकडे देण्यात आले होते. त्या कामाच्या चौकशीसाठी तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला भेट देऊन गैरव्यवहार झालेल्या कागदपत्रांची नुकतीच तपासणी केली. गावातील सामाजिक कार्यकर्ते मारुती राजाई यांनी ग्रामपंचायतीमध्ये उद्योग खात्री योजनेमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याची चौकशी करावी व दोषींवर योग्य ती कायद्यानुसार कारवाई करावी, असे निवेदन जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांना दिले होते. गावातील शेतकरी कामावर न जाताच त्यांच्या नावाने बोगस हजेरी व बिले दाखवून लाखो रुपये हडप केले आहेत, असा आरोपदेखील मारुती राजाई यांनी केला आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळावी म्हणून त्यांनी ग्रामपंचायतला माहिती हक्क अर्ज केला असता त्यांना अर्धवट माहिती देऊन त्यांची दिशाभूल देखील करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांनी केला आहे.
या योजनेमधील विहिरी, कच्चे रस्ते मेटलिंग व इतर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. याची चौकशी करण्यासाठी तालुका पंचायत अधिकारी बी. डी. कडेमनी, अभियंता मुर्गेश यकंची यांनी केदनूर ग्रामपंचायतला भेट देऊन संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी तक्रारदार मारुती राजाई यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन कागदपत्रांची तपासणी केली व हा अहवाल संबंधित ओम्बुडसमनना न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.
ता. पं. अधिकारी 24 रोजी ग्रा. पं.ला पुन्हा भेट देणार
यावेळी ग्रामपंचायतमधून तालुका पंचायत अधिकाऱ्यांना अर्धवट माहिती मिळाल्याने त्यांनी पुन्हा दि. 24 जून रोजी ग्रामपंचायतला तालुका पंचायत अधिकारी भेट देऊन संपूर्ण अहवाल पडताळणी करून ओम्बुडसमनना अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या गैरव्यवहारात ग्रामपंचायत अध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी व क्लार्क यांचा सहभाग आहे यांच्यावर कारवाई व्हावी, असे निवेदनात नमूद आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.









