माजी न्यायाधीशांकडून चौकशी-कागदपत्रांची पडताळणी
खानापूर : येथील भाग्यलक्ष्मी साखर कारखान्यात शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी साखर आयुक्तांकडे केली होती. याची दखल घेऊन राज्य सरकारने निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी 11 वा. न्यायाधीश वस्त्रमठ यांनी भाग्यलक्ष्मी कारखान्याला भेट देत चौकशीस प्रारंभ केला. भाग्यलक्ष्मी साखर कारखाना सध्या महालक्ष्मी शुगर अॅण्ड अॅग्रो लि. तोपिनकट्टी यांच्यामार्फत गेल्या पाच वर्षांपासून चालविला जात आहे. यापूर्वी हा साखर कारखाना लैला शुगर्स या कंपनीने 30 वर्षांच्या भाडेतत्त्वावर 2009 साली भाग्यलक्ष्मीकडून घेतला होता. त्यानंतर 2018 साली हा कारखाना महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टीने भाडेतत्त्वावर घेऊन गेल्या पाच वर्षांपासून चालविला आहे. साखर कारखान्यात प्रतिवर्षी तीन लाख टन उसाचे गाळप करण्यात येत आहे. माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी या कारखान्यात शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राज्य साखर आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली होती. याची सिद्धरामय्या सरकारने दखल घेत निवृत्त न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच त्यांना एक महिन्याच्या आत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार मंगळवारी चौकशी अधिकाऱ्यांनी कार्यस्थळावर भेट देऊन कारखान्याची पाहणी केली. सलग चार तास कागदपत्रांची तपासणी व चौकशी केली आहे.
या चौकशीनंतर अधिकारी एम. बी. वस्त्रमठ यांनी माहिती देताना सांगितले की, सरकारच्या आदेशानुसार याठिकाणी चौकशीसाठी आलो असून कारखान्याची पाहणी केली आहे. तसेच या कारखान्यासंदर्भात भाग्यलक्ष्मी, लैला शुगर्स तसेच महालक्ष्मी शुगर अॅण्ड अॅग्रो या तिन्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक असलेली कागदपत्रे पुरविली आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी चौकशीला आवश्यक ते सहकार्य केले आहे. पुन्हा 19 डिसेंबरला कार्यस्थळावर येऊन उर्वरित कागदपत्रांची, इतर आवश्यक माहिती आणि तपासणी करणार आहे. त्यानंतर चौकशीचा अहवाल शासनाला देणार आहे, असे त्यांनी चौकशीनंतर सांगितले. या चौकशीदरम्यान तक्रारदार माजी आमदार अंजली निंबाळकर उपस्थित नव्हत्या. त्यांनी आपण चौकशीला हजर राहू शकणार नसल्याचे लेखी पत्र ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांच्याकडून पाठवले होते. कोळी यांनी हे पत्र न्यायाधीश एम. बी. वस्त्रमठ यांना देऊन चौकशीच्या ठिकाणी बराच वेळ बसून राहेले होते. यानंतर पत्रकारांनी कोळी यांना विचारले असता त्यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच माजी आमदार निंबाळकरच माहिती देतील, असे सांगितले.
भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित : कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांचा दावा
भाग्यलक्ष्मी साखर कारखान्यात शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून चौकशीसाठी अधिकारी नेमण्यात आले आहेत. आम्ही चौकशीसाठी आलेल्या निवृत्त न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांना चौकशीसाठी आवश्यक ते सहकार्य केले असून यापुढेही चौकशीला सामोरे जाणार आहोत. या कारखान्यात कोणताही भ्रष्टाचार झाला नसून साखर संचालकांच्या नियमानुसारच कारखाना भाडेतत्त्वावर लैला शुगर्सकडून महालक्ष्मी ग्रुपने घेतला आहे. मात्र राजकीय हेतूने प्रेरित होऊन या कारखान्यात शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा हास्यास्पद आरोप करण्यात आला आहे. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. मात्र शेतकऱ्यांचे हीत जपण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया महालक्ष्मी ग्रुपचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांनी साखर कारखाना भ्रष्टाचार चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. पुढे ते म्हणाले, भाग्यलक्ष्मी साखर कारखाना 2009 साली तत्कालीन आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या पुढाकाराने लैला ग्रुपकडे 30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. त्यानंतर लैला ग्रुपकडून 2018 साली महालक्ष्मी शुगर अॅण्ड अॅग्रो या कंपनीने भाडेतत्त्वावर घेतला आहे. यावेळी शासनाच्या सर्व सूचनांचे आणि अटींचे पालन करून शासनाच्या परवानगीनंतरच महालक्ष्मी शुगर अॅण्ड अॅग्रो या कंपनीद्वारे साखर कारखाना चालविण्यात येत आहे.
गेल्या पाच वर्षांत पहिली दोन वर्षे लैला शुगर आणि महालक्ष्मी अॅग्रो यांच्या भागीदारीतून हा कारखाना चालविण्यात आला. त्यानंतर 2020 पासून महालक्ष्मी अॅग्रो स्वतंत्रपणे हा कारखाना चालवत आहे. या तीन वर्षांत शेतकऱ्यांचे हीत डोळ्यांसमोर ठेवून उसाला योग्य दर देण्यात येत असून उसाची बिले अवघ्या पंधरा दिवसांत खात्यावर जमा करण्यात येत आहेत. तसेच शेतकऱ्यांना साखरही योग्य भावात देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळोवेळी करण्यात येत असून कर्मचाऱ्यांचे हीत जपण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांत साखर कारखाना सुरळीत सुरू असून दरवर्षी 3 लाख टनाच्या उद्दिष्टाप्रमाणे गाळप होत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न मार्गी लागला आहे. असे असताना विधानसभेच्या निवडणुकीतील पराभव पचवता न आल्याने राजकीय हेतूने प्रेरित होऊन या कारखान्यात शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा बिनबुडाचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप करताना साखर कारखान्यासंदर्भातील माहिती घेणे आवश्यक होती. कारखाना उभारणीपासून आतापर्यंत जेवढी उलाढाल झाली नाही, तेवढ्या शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा हास्यास्पद आरोप करण्यात आला आहे. यावरूनच आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी अशा खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता आपला ऊस साखर कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महालक्ष्मी शुगर अॅग्रोचे संचालक विठ्ठल करंबळकर, यल्लाप्पा तिरवीर, चांगाप्पा निलजकर यांसह इतर उपस्थित होते.









