हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला ः तपास यंत्रणांना मोठा दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी आफताब पुनावालाने जंगलात फेकलेल्या हाडांचा डीएनए हा श्रद्धा वालकरच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला आहे. त्यामुळे आफताबने जंगलात फेकलेले मृतदेहाचे तुकडे श्रद्धाच्याच शरीराचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. फोरेन्सिक अहवालात समोर आलेल्या या गोष्टीमुळे श्रद्धा हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे.
दिल्ली पोलिसांनी महरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून काही हाडे हस्तगत केली होती. त्याशिवाय, आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर राहत असलेल्या घरातून काही पुरावे दिल्ली पोलिसांनी जमा केले होते. यामध्ये घरात आढळलेल्या रक्ताच्या डागाचे नमुने घेतले होते. हे सगळे पुरावे न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. हे ब्लड सॅम्पलही तपासणीअंती श्रद्धाचेच असल्याचे स्पष्ट झाले आहेत. जंगलात सापडलेली हाडे ही आरोपी आफताब पुनावालाने दिलेल्या माहितीनंतर जप्त करण्यात आली होती.
आरोपी आफताबकडून पोलीस चौकशीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे आफताबविरोधात पुरावे जमा करण्याचे मोठे आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे. दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए सॅम्पल घेतले होते. दिल्लीतील जंगलात आढळलेली हाडे आणि श्रद्धाच्या वडिलांचा डीएनए जुळला असून ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकारात्मक अहवालांमुळे तपासात मदत
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडात पोलिसांना सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून (सीएफएसएल) डीएनए अहवाल आणि आरोपी आफताब पुनावालाचा पॉलिग्राफ चाचणी अहवाल मिळाला आहे. या दोन्ही अहवालांमुळे आम्हाला तपासात मदत होईल, असे दिल्ली पोलिसांचे विशेष सीपी (कायदा आणि सुव्यवस्था) सागरप्रीत हुड्डा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सीबीआयच्या ‘सीएफएसएल’कडून डीएनए अहवाल प्राप्त झाला असून रोहिणीस्थित फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने बुधवारी पुनावालाच्या पॉलिग्राफ चाचणीचा अहवाल सादर केला. श्रद्धा हत्येप्रकरणी आम्हाला पॉलिग्राफ आणि सीएफएसएलकडून अहवाल मिळाला आहे. त्यावर आम्ही पुढे काम करू. आता डीएनए आणि पॉलिग्राफचे दोन अहवाल आले आहेत, तर नार्को टेस्टचा तिसरा अहवाल येणे बाकी आहे. सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रत्येकाचे विश्लेषण केले जाईल. तसेच मृतदेहाचे तुकडे पोस्टमॉर्टम तपासणीसाठी एम्समध्ये पाठवले जातील, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रातील वसई येथील असलेले श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. कुटुंबीयांचा विरोध असल्याने हे दोघेही दिल्लीत स्थायिक झाले होते. मात्र, काही महिन्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. त्यानंतर आफताबने मे महिन्यात श्रद्धाची हत्या करत तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. दोन महिने झाले तरी श्रद्धाने कोणताही थेट संपर्क साधला नसल्याने तिच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात तिची हत्या झाल्याचे समोर आले होते.
पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानुसार आफताब आणि श्रद्धा यांच्यात सातत्याने भांडणे, वादविवाद होत असत. तसेच आफताबने अनेकदा श्रद्धाला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर काही वेळेस श्रद्धाने आफताबचे घर सोडले होते. मात्र, आफताबने माफी मागत तिला घरी नेले होते. मात्र, आफताबवर विश्वास दाखवणे हे श्रद्धाच्या जीवावर बेतले होते.









