बेळगाव : व्हॅक्सिन डेपो मैदानावर 2017 मध्ये आयोजित महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण करून कन्नड व मराठी भाषिकांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत टिळकवाडी पोलिसांनी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात सुनावणी सुरू असून बुधवारी तपास अधिकाऱ्याची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्याची पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे. बेळगावातील सुवर्णसौधमध्ये 2017 साली कर्नाटक सरकारने विधिमंडळाचे अधिवेशन भरविले होते. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिकांच्यावतीने व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यावेळी प्रक्षोभक भाषण करून मराठी आणि कन्नड भाषिकांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत टिळकवाडी पोलिसांनी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयात तपास अधिकाऱ्याची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्याची पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे. समिती नेत्यांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. रिचमॅन रिकी काम पाहत आहेत.









