प्रतिनिधी/ बेळगाव
खोटे आरोप करून गेल्या काही दिवसांपासून धर्मस्थळ येथे एसआयटीच्या माध्यमातून काही घटनांच्या शोधासाठी खोदकाम करण्यात येत आहे. यामध्ये विनाकारण धर्माधिकारी डॉ. विरेंद्र हेगडे यांना गोवण्याचे षड्यंत्र राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. धर्मस्थळ हे मंजुनाथश्वराचे अत्यंत पवित्र असे स्थान असून लाखो भक्त येथे दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. धर्माधिकारी विरेंद्र हेगडे यांच्याकडून धर्मस्थळसह राज्यातील नागरिकांसाठी मोलाचे योगदान देण्यात येत आहे. यामुळे एसआयटीकडून होत असलेले काम श्रद्धा आणि सौहार्दाच्या मूल्यांचा अवमान होत आहे. हे त्वरित थांबवून दिलासा देण्याची मागणी धर्मस्थळ हितरक्षण संघाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
प्रारंभी धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपत गल्ली, काकतीवेस, राणी चन्नाम्मा सर्कल मार्गे हिंदू संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सभेचे आयोजन केले होते. व्यासपीठावर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह विविध मठाचे महास्वामीजी, माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.
धर्मस्थळला बदनाम करणारे व्यक्ती निराधार आरोप करत आहेत. सरकारने या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीमार्फत करण्यात येत असलेल्या तपासात अद्याप कोणताही ठोस पुरावा आढळून आलेला नाहे. यातून सिद्ध होते की, सदर व्यक्तींकडून खोटे आरोप करण्यात आलेले आहेत. यामुळे धर्मस्थळाची प्रतिमा मलीन झालेली आहे. यामुळे खोटे आरोप करणाऱ्यांची सखोल चौकशी करून राज्याच्या जनतेसमोर सत्य बाहेर आणावे.
डॉ. विरेंद्र हेगडे अनेक दशकांपासून धर्मस्थळचे धर्माधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. दरवर्षी लाखो भाविकांना अन्नदान करण्यात येत आहे. राज्यात शैक्षणिक संस्थांची स्थापना करून हजारो ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक ज्ञानाने सक्षम बनविले आहे. श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास प्रकल्पाद्वारे ग्रामीण विकास आणि स्वयंरोजगारासाठी अभूतपूर्व काम केले आहे. ट्रस्टच्या माध्यमातून शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. संस्कृती, कला जतन करून भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचे पालनपोषण केले आहे.
डॉ. विरेंद्र हेगडे नेहमीच राजकारण व संकुचित हितसंबंधांपेक्षा वरचढ राहिले आहेत. ते एक अध्यात्मिक नेते असून आपले जीवन केवळ समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. अशा व्यक्तीला बदनाम करण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. निराधार आरोप व चौकशीमुळे होणाऱ्या छळापासून विरेंद्र हेगडे यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.









