ग्रामस्थांचे कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना निवेदन
वार्ताहर/गुंजी
खानापूर तालुक्यातील घोटगाळी ग्राम पंचायत सदस्यांनी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांकडून काही रक्कम जमा केली आहे. ती कोणत्या उद्देशाने केली आहे. याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन परशुराम कोलेकर आणि इतर ग्रामस्थांच्या सहिनिशी खानापूर कार्यनिर्वाहक अधिकारी, घोटगाळी ग्रामपंचायत पीडीओसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि आमदारांना देण्यात आले आहे. त्यामुळे घोटगाळी ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ माजली आहे.
वास्तविक सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सर्व आवास योजना या गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना विनाशुल्क देण्यात येतात. मात्र घोटगाळी ग्रामपंचायत सदस्यांनी लाभार्थ्यांची निवड करत असताना सर्व नियम बाजूला ठेवून आपला स्वार्थ साधण्याच्या हेतूने मर्जीतल्या निवडक लाभार्थ्यांची निवड केली आहे. तसेच सदर लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत वरिष्ठांना काही रक्कम देण्यासाठी त्यांच्याकडून पंधरा ते अठरा हजाराची रक्कम वसूल केली असल्याची बाब सदर लाभार्थ्यांनी लेखी स्वरूपात देऊन उघड केली असली तरी त्याही लाभार्थ्यांवर दमदाटी करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याने त्याबद्दल ग्रामस्थांतून तीव्र नापसंती आणि संताप व्यक्त केला जात आहे.
सदर निवेदनावर चंद्रकांत देसाई, एल. एन. सनदी, नारायण पवार, पांडुरंग कुंभार, सटवाप्पा कुंभार, खेमराज गडकरी आदींच्या सह्या आहेत. सदर प्रकरणाची चर्चा सध्या सोशल मीडियासह अनेक न्यूज चॅनलवरती पसरल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन सखोल चौकशी करावी. तसेच दोषींवर कडक कारवाई करून गरीब लाभार्थ्यांसह जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी होत आहे.









