दक्षिण सोलापूर :
वरळेगांव दलित वस्ती व मांतग वस्ती कामातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी भाजपचे जिल्हा चिटणीस श्रीमंत हक्के यांनी केली आहे.
वरळेगांव येथील दलित वस्ती येथे सौरभ माने घर ते रानबा देढे घर सिमेंट रस्ता करणे रक्कम रुपये ५ लाख व मांतग व येथे सिमेंट रस्ता करणे रक्कम रुपये ३ लाख इतकी रक्कम मंजूर होती. परंतु ग्रामसेवक गजानन स्वामी व शाखा अभियंता विलास कोंडगुळे यांनी गावातील खाजगी ठेकेदारास हाताशी धरुन सदर काम निर्धारित ठिकाणी न करता राजकीय स्वार्थापोटी व मतदाराना भुलविण्याकरीता इतर जनरल वस्त्यामध्ये काम करुन, मूल्यांकन करुन दलित वस्तीतील लोकांवर अन्याय केला आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असता पंचायत समिती विस्तार अधिकारी शंकर पाटील यांनी १ एप्रिल २०२५ रोजी तक्रारदार, ग्रामसेवक व दलित वस्तीतील लोकांसमोर कामाची पाहणी केली असता कार्यारंभ आदेशात नमूद असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम दिसून आले नाही. अशा पध्दतीचा लेखी अहवाल मा. गटविकास अधिकारी द. सोलापूर यांच्याकडे सादर केला आहे. तरी आपण व समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर या स्वतंत्र यंत्रणेकडून तक्रारदार व दलित वस्तीतील लोकासमोर कामाची समक्ष चौकशी करुन सदर दोषी अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी व कार्यारंभ आदेशात नमूद केले प्रमाणे संबंधित ठिकाणी काम करून मिळावे. अन्यथा वेळेत न्याय न मिळाल्यास पत्रकार परिषद घेऊन सदर बाबी बाबत प्रशासनाच्या गैर कारभारचा उलगडा करावा लागेल, याची नोंद घ्यावी.








