स्वातीच्या पतीवर संशय व्यक्त : माहेरच्या मंडळींचे पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : वीस दिवसांपूर्वी बेंगळूर येथे संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या गणपत गल्ली, मच्छे येथील नवविवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. तिच्या माहेरच्या मंडळींनी पतीवर संशय व्यक्त केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी गुरुवारी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह संशयास्पद मृत्यू झालेल्या स्वाती श्रीधर सनदी (वय 28) या नवविवाहितेच्या माहेरवासियांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांना निवेदन देण्यात आले असून संपूर्ण प्रकार सांगण्यात आला आहे. पतीनेच तिचा खून करून आत्महत्येचा बनाव केल्याचा संशय माहेरवासियांनी व्यक्त केला आहे. स्वातीचे माहेर मुतगे, ता. बेळगाव येथील आहे. तिचे वडील अनंत शंकर केदार (वय 59) राहणार शिवाजीनगर, मुतगे यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. अठरा महिन्यांपूर्वी मच्छे येथील श्रीधर सनदी या तरुणाबरोबर स्वातीचे लग्न झाले.
लग्नानंतर पती व सासरच्या मंडळीकडून सतत या ना त्या कारणाने तिचा छळ करण्यात येत होता. आपण काम करीत असलेल्या कंपनीच्या कामानिमित्त श्रीधर कुवेतला गेला होता. यावेळी स्वातीची आजी आजारी असल्यामुळे तिला भेटण्यासाठी ती बेळगावला आली. पंधरा दिवसांनी आजीचे निधन झाले. त्यावेळी स्वाती आपल्या माहेरीच होती. मे 2025 मध्ये कुवेतहून बेळगावला आलेला श्रीधर तिला बोलावण्यासाठी माहेरी आला. त्याच्यासोबत जाण्यास स्वातीने नकार दिला. दोन दिवसानंतर काही मध्यस्थांनी समजूत काढून स्वातीला सासरी पाठविले. त्यानंतर जूनमध्ये श्रीधरने तिला बेंगळूरला नेले. 12 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता श्रीधरने आपले सासरे अनंत केदार यांना फोन केला. स्वातीने आत्महत्या करून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर मुतगे येथून सहा-सात जण बेंगळूरला गेले. के. आर. पुरम पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली. स्वातीचा मृतदेह मच्छेला आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हापासूनच आम्हाला श्रीधरवर संशय आहे. स्वातीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.









