युवक मंडळ-ग्रामस्थांचा ग्रामपंचायतवर मोर्चा : सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी
वार्ताहर /धामणे
धामणे ग्राम पंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची आणि ग्रामसभा न घेताच सभा घेतल्याचे तालुका पंचायत व जिल्हा पंचायतला खोटे पुरावे पाठविल्याचा आरोप करत धामणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवक मंडळ आणि गावकऱ्यांच्या वतीने ग्राम पंचायतवर सोमवार दि. 30 रोजी मोर्चा काढण्यात आला. याची वरिष्ठ पातळीवर तातडीने चौकशी करून ग्राम पंचायतच्या दोषी सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तालुका पंचायत एईओ यांना सादर करण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, आंबेडकरनगर (मागास) वर्गासाठी आलेल्या राखीव फंडातील 8 लाख रुपयांचा घोटाळा मागील पीडीओ आणि काही ग्रामपंचायत सदस्यांकडून भ्रष्टाचाराचा आरोप करत चौकशीची मागणी आंबेडकर युवक मंडळाकडून करण्यात आली होती. परंतु एक महिना झाला तरी वरिष्ठांकडून चौकशी झाली नाही. म्हणून भ्रष्टाचाराच्या काही पुराव्यासकट सर्व नागरिक मोर्चाने ग्राम पंचायत आवारात सकाळी 11.30 वाजता उपस्थित होते. तेव्हा ग्राम पंचायत अध्यक्ष पंडित पाटील आणि पीडीओ उषा एस. यांनी तुमची काय तक्रार आहे ती द्या, असे सांगितले.
तेव्हा ‘तालुका पंचायत अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवा, आम्ही त्यांच्याकडे निवेदन देतो’ असे मोर्चाचे नेतृत्व करत असलेले रवि बस्तवाडकर यांनी सांगितले. त्यानंतर बंदोबस्तासाठी उपस्थित पोलीस अधिकारी व ग्राम पंचायतच्यावतीने तालुका पंचायत अधिकाऱ्यांना वर्दी दिल्याने तालुका पंचायतचे एईओ हे धामणे ग्राम पंचायतला दाखल होवून आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी करण्यासाठी संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवितो, असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले. याप्रसंगी गावातील पंचायतच्या भ्रष्ट कारभाराबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांना माहिती दिली. मोर्चात यल्लापा कालवदार, अर्जुन मनुगोळ, गोपाळ केळगेरी, शिवाजी चौगुले, प्रकाश बाळेकुंद्री, ग्रा. पं. माजी सदस्य विजय बाळेकुंद्री व आंबेडकर युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.वडगाव ग्रामीण पोलीस अधिकारी फौजफाट्यासह याप्रसंगी उपस्थित होते.









