प्रतिनिधी,कोल्हापूर
क्षीरसागर कुटुंबीय आणि सचिन राऊत यांनी राज्य शासनाच्या ताब्यातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेचे चुकीच्या पद्धतीने खरेदीपत्र केले आहे. त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. तसेच यामधील सचिन राऊत हे पानपट्टी व्यावसायिक आहेत. त्याच्याकडे 6 कोटी 50 लाख रुपये इतकी रक्कम आली कोठून? याची चौकशी करण्यात यावी. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
इंगवले म्हणाले, संस्थान काळात पेंढारकर कुटुंबियाना अटी-शर्तींवर ही जागा देण्यात आली. यामध्ये या जागेचा वापर स्टुडिओसाठी करावा व ही जागा शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरीत करता येणार नाही, असे म्हटले आहे. तरीही पेंढारकर व लता मंगेशकर यांनी लिलाव पध्दतीने ही जागा लता मंगेशकर यांना हस्तांतरीत केली. त्याचवेळी अटी व शर्तीचा भंग झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाची फसवणूक करत विनापरवाना मंगेशकर कुटुंबियांनी ती जागा सचिन राऊत यांना खरेदी दिली. खरेदीपत्रामध्ये 6 कोटी 50 लाख रुपये एक रकमी भरले आहेत. राऊत यांच्याकडे इतका पैसा आला कोठून याची चौकशी करण्यात यावी. तसेच यामध्ये ऋतुराज क्षीरसागर यांचीही गुंतवणूक आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी इंगवले यांनी केली. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, शहर समन्वयक विशाल देवकुळे, स्मिता सावंत आदी उपस्थित होते.