डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाचे ता. पं. समोर आंदोलन
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील अनेक पीडीओ तसेच इतर अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अनधिकृत कामांना परवानगी दिली आहे. कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, बाळेकुंद्री बुद्रुक, सांबरा, धामणे (एस.) या ग्राम पंचायत हद्दीत अनधिकृत लेआऊटना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित पीडीओंची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाच्यावतीने शुक्रवारी तालुका पंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राज्याध्यक्ष लक्ष्मण कोलकार यांच्या अध्यक्षतेखाली हलगीवादन करून अनोख्या पद्धतीने आंदोलन झाले. नियमबाह्या पद्धतीने शेत जमिनीमध्ये टाकण्यात आलेल्या लेआऊटला परवानगी देणे, कॉम्प्युटर उतारा देताना मोठ्या रकमेची मागणी करण्यात येत आहे. यामध्ये काही पीडीओंचा समावेश असून, त्यांची चौकशी करण्याची मागणी यापूर्वीच तालुका पंचायत, जिल्हा पंचायत कार्यालयांकडे केली होती. परंतु त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य न मिळाल्याने शुक्रवारी पुन्हा आंदोलन करण्यात आले.
पीडीओंनी बुडविलेला महसूल सरकारला जमा करावा
आंबेडकर शक्ती संघाने आंदोलन करताच प्रशासनाला जाग आली. तालुका पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन चौकशीचे आदेश दिले. परंतु यावर आंदोलक समाधानी न होता जो सरकारी महसूल पीडीओंनी बुडविला तो सरकारला जमा करावा अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. यावेळी सागर कोलकार, शोभा मत्तीवडे, मल्लाप्पा के., शेखर अडव्याप्पा कोलकार यासह इतर सदस्य उपस्थित होते.









