नंदगड सोसायटीमधून जादा दराने खत विक्री करून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा प्रकार
खानापूर : नंदगड येथील तालुका मार्केटिंग सोसायटीत गेल्या काही वर्षापासून खत विक्रीसह इतर गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात झाला आहे. यात सामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार माफक दरात खत विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाकडून सबसिडी देण्यात येते. मात्र नंदगड सोसायटीच्या खत विक्री केंद्रातून जादा दराने विक्री करून शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे. याबाबत शासनाकडे रितसर तक्रार दाखल करून मार्केटिंग सोसायटीत सुरू असलेल्या लुबाडणुकीची सखोल चौकशी करावी, तसेच जादा दराने विक्री केलेल्या खताचे पैसे पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी म. ए. समितीतर्फे केली. येथील शिवस्मारकात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती देण्यात आली.
याबाबत बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, समितीचे कार्यकर्ते रुक्माण्णा झुंजवाडकर व रमेश धबाले यांना मार्केटिंग सोसायटीत जादा दराने खत विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कृषी अधिकारी, तहसीलदार, ता. पं. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेऊन तालुका कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी खत विक्री केंद्रावर धाड टाकून जादा दराने खत विक्री करण्यात येवू नये, तसे झालेल्या व्यवहाराची संपूर्ण माहिती द्यावी, अशी नोटीस सेसायटीच्या सेक्रेटरीना दिली होती. त्यानंतर सोसायटीने खत विक्री योग्य दराने करण्यास सुरवात केली आहे. तसेच खत विक्री जादा दराने करण्याची चूक कर्मचाऱ्यांकडून झाली असून याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे पत्र कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे.
चूक झाल्याची कबुली
कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून चूक झाल्याची कबुली देण्यात येत आहे. त्या अर्थी निश्चितच मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध होत आहे. शेतकऱ्यांकडून जादा पैसे आकारताना इतर खर्चाची दुसरी पावती दिली आहे. म्हणजेच भ्रष्टाचाराचा हेतूच स्पष्ट होतो. यासाठी संबंधितांनी याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करावी.
आकारलेले जादा पैसे परत द्या
यावेळी रमेश धबाले म्हणाले, मागील वर्षीही या संस्थेकडून जादा दराने खत विक्री करण्यात येत होती. त्यावेळी तक्रार केल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे परत दिले होते. यावर्षीही युरिया व 10:26:26 ही खते जादा घेऊन विक्री करण्यात येत होती. याबाबत आम्ही तक्रार केल्यानंतर ही विक्री पुन्हा योग्य करण्यात येत आहे. जादा आकारण्यात आलेले पैसे पुन्हा शेतकऱ्यांना देण्यात यावेत, अन्यथा याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत, तसेच गेल्या काही वर्षापासून संस्थेत गैरव्यवहार झाला आहेत. याची लोकायुक्ताकडे तक्रार करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा हाच आमचा हेतू आहे. मार्केटिंग सोसायटीच्या खत विक्री केंद्रातून कायमच शेतकऱ्यांची लूट होत असते. यावेळी आम्ही रितसर तक्रार केली. याची दखल घेण्यात आली आहे. मात्र याबाबत दोषींवर कारवाईसाठी वरिष्ठ पातळीपर्यंत पाठपुरावा करणार आहोत. यावेळी प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, शंकर गावडा यांनीही विचार व्यक्त केले.









