शहापूर येथे रास्ता रोको करून केली निदर्शने : पालकमंत्र्यांना निवेदन
बेळगाव : शहराच्या दक्षिण भागामध्ये स्मार्ट सिटीच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. निष्पाप जनतेची घरे पाडविण्यात आली आहेत. कामांचा दर्जा निकृष्ट आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी मंगळवारी महात्मा फुले रोड व एसपीएम रोडवरील सर्कलवर रास्तारोको केला. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र निदर्शने केली. भ्रष्टाचारामध्ये सामील असलेल्यांची चौकशीची करावी, अशी मागणी करण्यात आली. महात्मा फुले रोड येथील रहदारी सिग्नलपासून जुन्या धारवाड रोड रस्त्याचे रुंदीकरण केले. हे करत असताना सीडीपीप्रमाणे रस्ता केला नसल्याचा आरोप केला. काही कुटुंबांवर दडपशाही करत त्यांच्या इमारती जमीनदोस्त केल्या असून, त्या विरोधात संबंधित कुटुंबांनी न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. न्यायालयाने नुकसानभरपाईही द्यावी, असा आदेश दिला आहे. ती नुकसानभरपाई देणार कोण? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
भ्रष्टाचाऱ्यावर कारवाईचे आश्वासन
स्मार्ट सिटीमधील जी कामे झाली आहेत ती निकृष्ट झाली आहेत. त्याची संपूर्ण चौकशी करावी, रस्ता रुंदीकरण करताना सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास दिला गेला आहे. जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, स्मार्ट सिटीसह इतर योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप होत आहे. सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.









