आजपासून आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरु करणार आहोत. ज्ञानेश्वरी वाचावी, समजून घ्यावी अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा असते. ज्ञानेश्वरांना सर्वच भक्त प्रेमाने माउली असे म्हणतात. ज्ञानेश्वरीला भावार्थदीपिका हे रूढ नाव आहे पण ती ज्ञानेश्वरी म्हणूनच प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरी वाचत असताना माउलींचे शब्दभांडार पाहून आपण चकित होतो. माउलींनी गीतेतील तत्वे सर्वांना सहज समजतील अशी सांगितली आहेत. माउलींना श्री विष्णूचा अवतार मानतात. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, हजारो वर्षापूर्वी भगवंतांनी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर गीता सांगितली आणि नंतर सातशे वर्षापूर्वी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. संस्कृत भाषा सर्वसामान्यांना समजायला अवघड असल्याने त्यांना गीतेतील तत्वे अवगत व्हावीत आणि ती आचरणात आणण्यासाठी मार्गदर्शन मिळावे ह्या उद्देशाने माउलींनी ज्ञानेश्वरीत गीतेचे मराठी भाषेमध्ये विवरण केले आहे. त्यालाच टीका असे म्हणतात. साधारणपणे टीका करणे म्हणजे नावे ठेवणे, निंदा करणे असा अर्थ घेतला जातो परंतु येथे विवरण असा अर्थ घ्यायचा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माउलींनी गीतेवर टीका करताना भगवंतांनी अर्जुनाला केलेल्या उपदेशाच्या गाभ्याला कुठेही धक्का न लावता सविस्तर विवरण करून जागोजागी स्वत:चे मतही नोंदवले आहे. त्यामुळे हे नुसते भाषांतर नसून अभ्यासपूर्ण विवेचन झालेले आहे.
माउलींचा स्वभाव अत्यंत विनम्र आहे म्हणून सुरवातीला ते म्हणतात, सद्गुरू निवृत्तीनाथांनी आज्ञा केली म्हणून हे धाडस मी करत आहे. हे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते मग येथे माझा पाड कसा लागणार? हे करणे म्हणजे काजव्याने सूर्याला दिवा दाखवल्यासारखे आहे. मात्र या कामी मला श्रीगुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता लाभली आहे. त्यांच्या आधारावर धीर धरून मी गीतार्थ सांगण्याचा यत्न करतो आहे. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट झाली तर मुक्याला वाचा फुटते. सद्गुरूंची कृपा आहे म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे. कळसूत्री बाहुली सूत्रधार जसे नाचवतो तसे नाचते. त्याप्रमाणे मी सद्गुरूंचे मनोगत त्यांच्या सांगण्यानुसार तुमच्यापर्यंत पोहोचवणारा निरोप्या आहे. सद्गुरू वदवून घेतील तसे मी सांगणार आहे.
गीता हा शुद्ध तत्वज्ञानविषयक ग्रंथ आहे पण त्यात तत्वाचा उलगडा करून सांगण्यासाठी आवश्यक असलेली उदाहरणे कमी आहेत. माउलींच्या विवेचनात मात्र उदाहरणांची रेलचेल आढळते. त्याला अध्यात्मात दृष्टांत असे म्हणतात. दृष्टांत देताना निसर्गात कायम आढळणाऱ्या गोष्टींचा माऊली उपयोग करतात. उदाहरणार्थ चंद्र, सूर्य, पृथ्वी, विविध प्राणी, नद्या, नाले इत्यादि. त्यामुळे ही उदाहरणे विषय समजून घ्यायला कायम उपयोगी पडणारी आहेत. आपल्या अभ्यासात आपण ह्या उदाहरणावरूनच गीतेतील तत्वे समजावून घेणार आहोत.
आपल्या लेखमालेमध्ये, विनोबांनी केलेले गीतेच्या संस्कृत श्लोकांचे मराठी भाषांतर असेल. ते त्यांच्या गीताई ह्या पुस्तकातून मी घेणार आहे. ते त्यांनी सर्वांना सहज समजेल असे केले आहे. ज्ञानेश्वरी मराठीत आहे मग गीतेचे श्लोकही मराठीत असणं योग्य ठरेल. ज्यांना संस्कृत आवडतं, समजतं त्यांनी संस्कृत श्लोकाचा संदर्भ घेतला तरी चालेल पण येथे फक्त श्लोकाचे विनोबांनी तयार केलेले मराठी पद्य भाषांतर मी देणार आहे. ते भाषांतर वाचून सदस्यांनी श्लोकावर स्वत:चे मत तयार करून मग माउलीनी केलेले विवरण वाचले की, भगवंतांना त्या श्लोकातून काय सांगायचे असेल ते सुस्पष्ट होत जाईल.
क्रमश:








