प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य ग्रंथालय येथे आयोजित बुक लव्हर्स क्लबच्या साप्ताहिक कार्यक्रमात स्वतः लेखिका असलेल्या मीना कुलकर्णी यांनी ‘महाभारतातील स्त्रिया’ या पुस्तकाचा ओघवत्या भाषेत सुंदर परिचय करून दिला. ‘व्यासोच्छिष्ट जगत्सर्वम्’ असे महाभारताबद्दल म्हटले जाते. डॉ. आ. ह. साळुंखे या विद्वान लेखकांनी त्यावेळच्या प्रथा, पद्धतींविषयी तर्कशास्त्र विश्लेषण करीत सावित्री-सत्यवान, माधवी-शकुंतला, अंबा-अंबालिका आणि द्रौपदी या महाभारतातील महत्त्वाच्या पात्रांबद्दल विवेचन केले.
तुळशीविवाह, स्वयंवर, वधुशुक्ल, शकुंतला-दुष्यंत, मातृसत्ताक-पितृसत्ताक पद्धती, सती प्रथा, बहुपतीत्व, सामाजिक आशय, स्त्रियांवर होणारा अन्याय, त्याचा आज प्रचलित असलेल्या चालीरीतींशी संबंध, नक्की मूळ गोष्ट काय? आणि आजची स्थिती आदी पुस्तकात मांडण्यात आले आहे. प्रारंभी अध्यक्ष चैतन्य हलगेकर यांनी स्वागत व परिचय करून दिला. नंतरच्या चर्चेत श्रोत्यांनी अनेक प्रश्न विचारत भाग घेतला.