130 किमीपर्यंतचे मायलेज ः किमतीच्या खुलासा नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी निर्माती कंपनी प्युअर ईव्हीने आपली नवी इलेक्ट्रिक बाइक इको ड्रिफ्ट नुकतीच सादर केली आहे. सदरची दुचाकी एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 130 किलोमीटरचे अंतर कापू शकते.
ग्राहकांना विपेत्याकडे जाऊन सदरच्या गाडीची चाचणी प्रत्यक्षरीत्या करता येणार आहे. परंतु कंपनीने या गाडीच्या किमतीबाबत मात्र कोणताही खुलासा केलेला नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ामध्ये नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या किमतीचा खुलासा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरची दुचाकी प्रति तासाला 75 किलोमीटर इतका वेग घेऊ शकणार आहे. 3 केडब्ल्यूएचची बॅटरी या गाडीला असणार असून एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर 85 ते 130 किलोमीटर पर्यंतचे अंतर सदरची नवी गाडी कापू शकेल.
इतर महत्त्वाच्या बाबी
याचप्रमाणे या गाडीची लोडिंग कपॅसिटी (भारवाहू क्षमता)140 किलो इतकी असणार आहे. समोरच्या चाकासाठी डिस्क ब्रेकची योजना असून मागील चाकासाठी ड्रम ब्रेकची सोय करण्यात आली आहे. ब्लॅक, ग्रे, ब्ल्यू आणि रेड या चार रंगांमध्ये सदरची गाडी येणार आहे. बाजारामध्ये कंपनीची एट्रीस्ट 350 ही गाडी या आधी सादर करण्यात आली आहे.









