नवी दिल्ली
भारतातील सार्वजनिक क्षेत्रामधील मोठी बँक एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी आपले योनो अॅप पुन्हा एकदा नव्याने सुधारित पद्धतीने लॉन्च केले आहे. कार्डलेस रक्कम काढण्याच्या सुविधेसोबत इतर अन्य सुविधाही या अॅपमध्ये असणार आहेत.
एसबीआय कार्डधारकांना आपली रक्कम कोणत्याही एटीएममधून एटीएम कार्डशिवाय काढता येण्याची महत्त्वाची सुविधा या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे. यूपीआयची सुविधा यात असून स्कॅन व पे, संपर्कासह (कॉन्टॅक्ट)पेमेंट व पैशाची मागणी (रिक्वेस्ट)यासारख्या सोयी यात समाविष्ट आहेत.
अॅप नव्याने इन्स्टॉल करावे लागणार
68 व्या बँक दिनाच्या दिवशी एसबीआयने सदरचे योनो अॅप नव्याने सादर केले आहे. यूपीआयची सुविधा असलेल्या भारतातील सर्व एटीएमवर कार्डधारकांना रक्कम काढता येणार आहे. ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यायचा झाल्यास नव्याने योनो अॅप स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करणे गरजेचे असणार असल्याचे एसबीआयने म्हटले आहे.









