अॅपल 15 इंच सेगमेंटमध्ये सादर : भारतात 1.34 लाख किंमत राहणार
कॅलिफोर्निया
जगातील टेक कंपनी अॅपलने त्यांच्या वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्स-डब्लूडब्लूडीसी 23 मध्ये 15-इंच डिस्प्लेसह जगातील सर्वात कमी जाडीचा (11.5एमएम) लॅपटॉप मॅकबुक एअर लाँच केला आहे. भारतात त्याची सुरुवातीची किंमत 1.34 लाख रुपये असणार असल्याची माहिती आहे. 10,000 रुपयांपर्यंतची सवलतदेखील यावर उपलब्ध होणार आहे.
लॅपटॉप व्यतिरिक्त, अॅपलने आपल्या परिषदेमध्ये आणखी 3 उत्पादने लाँच केली आहेत. यांचेही सादरीकरण करण्यात आले आहे यामध्ये मिश्रित रिअॅलिटी हेडसेट व्हिजन प्रो, डेस्कटॉप मॅक प्रो आणि स्टुडिओ यांचा समावेश आहे. याशिवाय अॅपलने आपल्या ऑपरेटिंग सिस्टम आयओएस 17 ची फीचर्सदेखील उघड केली आहेत.

कंपनीने सादर केलेली उत्पादने
- मॅकबुक एअर 15 इंच
जगातील सर्वात कमी जाडीचा म्हणजेच 15 इंचाचा लॅपटॉप भारतात 1.34 लाख रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. यात 18 तासांचा बॅटरी बॅकअप आहे. हा लॅपटॉप मिडनाईट, स्टारलाइट, सिल्व्हर आणि स्पेस ग्रे या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.
- ‘व्हिजन प्रो’ हेडसेट
हा कंपनीचा पहिला मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट व्हिजन प्रो आहे. अॅपल व्हिजन प्रो ची किंमत 3,499 डॉलर म्हणजेच जवळपास 2.88 लाख रुपये असून पुढील वर्षी अमेरिकेत उपलब्ध होणार आहे. भारतात कधी उपलब्ध होईल याची माहिती कंपनीने दिलेली नाही. हा हेडसेट डोळयातील पडदा आणि हाताच्या हालचालीद्वारे ऑपरेट केला जाऊ शकतो.
कंपनी गेल्या 7 वर्षांपासून या उपकरणावर काम करत होती. सीईओ टिम कुक यांनी अॅपल व्हिजन प्रो ला एक नवीन सुरुवात म्हटले आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की व्हिजन प्रो घातल्यानंतर यूजर्स त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हर्च्युअल स्पेसमध्ये क्रोल करू शकतील.
- मॅक प्रो आणि मॅक स्टुडिओ डेस्कटॉप
अॅपलने एम2 अल्ट्रा चिपसेटसह दोन नवीन डेस्कटॉप ‘मॅक प्रो’ आणि ‘मॅक स्टुडिओ’ देखील लॉन्च केले आहेत. नवीन मॅक प्रो इंटेल आधारित मॅक प्रो पेक्षा 3 पट वेगवान आहे. नवीन मॅक प्रो आता 64 जीबी आणि 128 जीबी युनिफाइड मेमरी पर्यायांसह उपलब्ध आहे. भारतात त्याची सुरुवातीची किंमत 7.29 लाख रुपये आहे.
त्याच वेळी, मॅक स्टुडिओ डेस्कटॉप दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात, त्याचे बेस व्हेरिएंट 2.09 लाख रुपयांना आणि टॉप व्हेरिएंट 4.19 लाख रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. यात 12 आणि 24 कोर सीपीयू, 30 आणि 60 कोर जीपीयू, 16 आणि 32 कोर न्युलर इंजिन आहे.
डब्लूडब्लूडीसी 23 म्हणजे काय?
वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स हा वार्षिक कार्यक्रम आहे जो कंपनी कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथील मुख्यालयात आयोजित करते. आगामी नवे सॉफ्टवेअर बदल विकसकांसमोर सादर करण्यासाठी कंपनी या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करते.









