निवड कमिटी आज नागरिकांची मते जाणून घेणार
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघामध्ये म. ए. समितीकडून निवडणूक लढवू इच्छीणाऱ्या उमेदवारांच्या बुधवारी मराठा मंदिर येथे मुलाखती घेण्यात आल्या. अर्ज केलेल्या आठही सदस्यांना सीमाप्रश्नाच्या योगदानाबरोबर सीमालढा व पुढील दिशा या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यानंतर निवड कमिटी जनमताचा कौल घेणार आहे. म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यासाठी आठ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. यासाठी बेळगाव दक्षिण मतदारसंघातील 87 जाणकार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील सदस्य सहभागी करून घेण्यात आले आहेत. बुधवारी दुपारनंतर या निवड कमिटीने सर्व सदस्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची मते जाणून घेतली. वल्लभ गुणाजी, शुभम शेळके, रवी साळुंखे, आप्पासाहेब गुरव, अॅड. रतन मासेकर, मदन बामणे, मनोहर किणेकर व रमाकांत कोंडुसकर यांनी म. ए. समितीकडे उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. बुधवारी यापैकी 7 सदस्यांच्या मुलाखती झाल्या. एका सदस्याची मुलाखत होवू शकली नाही. गुऊवारी दक्षिण मतदारसंघात फिरून जनमताचा कौल घेतला जाणार आहे.
वल्लभ गुणाजी यांनी घेतली माघार
महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकच उमेदवार निवडून यावा या उद्देशाने वल्लभ गुणाजी यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला. निवड कमिटीच्या सदस्यांसमोर येवून त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. निवड समिती जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या मागे ठामपणे उभे राहू असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे आता 6 सदस्यांमधून अंतिम उमेदवार निवडला जाणार आहे.
उत्तरसाठी जाणून घेतला जनमताचा कौल : म. ए. समितीकडून चाचपणी : उमेदवार निवडीसाठीचा प्रयत्न
बेळगाव उत्तर मतदारसंघातून म. ए. समितीने जनमताचा कौल घेण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर पाच जणांच्या चार समित्या तयार करण्यात आल्या असून त्याद्वारे विभागवार नागरिकांची मते जाणून घेतली जात आहेत. उत्तर मतदारसंघासाठी दोन इच्छुक उमेदवारांनी म. ए. समितीकडे अर्ज दाखल केले आहेत. अॅड. अमर यळ्ळूरकर व नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी समितीकडे अर्ज दाखल केल्यानंतर या दोन्ही उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवड कमिटीच्या सदस्यांनी या उमेदवारांना प्रश्न विचारून त्यांची भूमिका जाणून घेतली. बुधवारी उत्तर मतदारसंघाचे चार विभाग तयार करण्यात आले असून त्याद्वारे नागरिकांचा कल जाणून घेतला जात आहे. नागरिकांचा कल जाणून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या दोन दिवसांत उमेदवारांची निवड केली जाणार आहे.