कारच्या काचा फोडून ऐवज पळविण्यात तरबेज
बेळगाव : महागड्या कारगाडींच्या चालाखीने काचा फोडून बॅग आणि किमती ऐवज पळविणाऱ्या एका आंतरराज्य चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात माळमारुती पोलिसांना मंगळवारी यश आले आहे. दिनदयाळन ऊर्फ दिन जयशिलन (वय 20, रा. मिल कॉलनी, रामजीनगर, ता. श्रीरंगम, जि. त्रिची, राज्य तामिळनाडू) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून सुमारे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी दिनदयाळन याचे वडील जयशिलन हा फरारी असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. बेळगाव शहरात उभ्या करण्यात आलेल्या महागड्या कारगाड्यांना वरील दोघे बाप-लेक लक्ष करत होते. चालाखीने कारगाड्यांच्या काचा फोडून त्यातील बॅग व किमती ऐवज पळविण्यात दोघांचा हातखंडा होता.
या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. या प्रकरणांचा तपास करण्यासाठी माळमारुती पोलिसांचे एक विशेष पथक तामिळनाडूला गेले होते. त्याठिकाणी वरील आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणी महागड्या कारगाड्यांच्या काचा फोडून ऐवज पळविल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे अॅपल कंपनीचे दोन लॅपटॉप, दीड लाख रुपये किमतीचे अॅपल कंपनीचे दोन आयपॅड आणि 50 हजार किमतीचा ऑटोस्कोप असा एकूण चार लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. गुन्हा करण्यासाठी त्याचे वडील जयशिलन यानेदेखील बेळगावात येऊन मदत केली आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी प्रयत्न चालविले आहेत. पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची, उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार, श्रीशैल हुळगेरी, उदय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.









