सातारा :
साताऱ्यातील भाजी मंडईत एकाच दिवशी सात मोबाईल चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात शाहूपुरी पोलिसांनी पाच परप्रांतीय आरोपींना अटक करत एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे. यातील पाच आरोपी झारखंड राज्यातील असून एक नांदेड जिह्यातील आहे. जगदीश रामचंद्र महतो वय 32, रा. महाराजपूर, जि. सहाबगंज, राज्य झारखंड, अजितकुमार सुरेश मंडल वय 24 रा. महाराजपूर, जि. सहाबगंज, राज्य झारखंड, रोहितकुमार सियाराम महतो वय 25 रा. महाराजपूर, जि. सहाबगंज, राज्य झारखंड, अर्जुन राजेश मंडल वय 20 रा. बसाकोला जि. सहाबगंज राज्य झारखंड, शोएब मस्तानसाहब शेख वय 24 रा. सलगारापूर, ता. मुखेड जि. नांदेड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून यांच्यासोबत एका अल्पवयीनला ताब्यात घेण्यात आलं आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, रविवारी सकाळी 10 ते 10.30 वाजता सातारा शहरातील भाजी मंडईत मोबाईल चोरीच्या घटना घडल्या. त्यातील दोन तक्रारदार शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले. घटनेचे गांभीर्य ओळखून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी घटनास्थळी पोलीस गाडी रवाना केली. ज्याठिकाणी मोबाईल चोरी झाली त्या परिसरात पोलीस चोरांचा शोध घेत होते.
पोलीस गाडी पेट्रोलिंग करत खण आळी परिसरात पोहोचली तेवढ्यात एक अल्पवयीन मुलगा एका व्यक्तीच्या खिशातून मोबाईल काढत असल्याचं महिला पोलीस अंमलदार कोमल पवार आणि त्यांच्यासोबत असलेले पोलीस हवालदार जयवंत घोरपडे यांना दिसले. तत्काळ पोलीस गाडीतून धाव घेत पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरं पोलिसांना देत होता. थोडावेळ गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये साताऱ्यातील एक वकिल आला तो पोलिसांना सांगू लागला मी वकिल आहे. हा मुलगा लहान आहे. त्याची चूक झालीय सोडून द्या. या सगळ्या प्रकारामुळं यामध्ये काहीतरी गोडबंगाल असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यांच्यासोबत अजून साथीदार असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्या मुलाला सोडण्याचं नाटक पोलिसांनी केलं.
तो वकिल त्या अल्पवयीन मुलाला घेऊन वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्या दोघांचा पाठलाग करायला सुरुवात केली. दोघे वाढे फाट्यावर पोहोचल्यानंतर त्याठिकाणी त्यांचे साथीदार स्विप्ट गाडीतून पोहोचले. त्याचवेळी पोलिसांनी घेराव घालत सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडे असलेले 12 मोबाईल जप्त केले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संशयीत आरोपी हे झारखंड राज्यातून पुण्यात आले. पुण्यात स्विप्ट गाडी भाड्याने घेऊन चोरी करायला साताऱ्यात आले. गणेशोत्सव काळात गर्दीची ठिकाणं टार्गेट करत पाच परप्रांतीय चोरांनी मोबाईल चोरायला सुरुवात केली आणि अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून जप्त केलेले मोबाईल चालू करताच चोरी झालेल्या फोनवर कॉल यायला चालू झालं आणि एक एक तक्रारदार पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देऊ लागले. यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात 5 आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात 2 असे 7 गुन्हे दाखल झाले असून उर्वरित मोबाईल कोणाचे आहेत. या परप्रांतीय चोरट्यांनी अजून कुठं चोरी केलीय का याचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे, पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, जोतीराम पवार, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत, स्वप्नील पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, जयवंत घोरपडे, महिला पोलीस अंमलदार कोमल पवार यांनी केली.








