अथणी पोलिसांची कारवाई : साडेचौदा लाखांचा ऐवज जप्त
बेळगाव : अथणी, कागवाड, ऐगळी व घटप्रभा पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात चोऱ्या, दरोडे प्रकरणातील एका आंतरराज्य गुन्हेगाराला अथणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून 14 लाख 40 हजार रुपये किमतीचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अर्जुन ऊर्फ अर्जेंट नबीसाब भोसले, रा. आरग, ता. मिरज, जि. सांगली असे त्याचे नाव आहे. 28 फेब्रुवारी रोजी अर्जुनला अटक करण्यात आली आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून 4 मार्च रोजी चोरीचा माल खरेदी केल्याच्या आरोपावरून सुनंदा ईश्वर भोसले, रा. कदमवाडी, ता. मिरज या महिलेला अटक करून तिच्याजवळून 180 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अथणी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 22 डिसेंबर 2024 रोजी एका न्यायाधीशांच्या घरात चोरी झाली होती. अर्जुन ऊर्फ अर्जेंटनेच ही चोरी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्याने एक दरोडा, एक वाटमारी व आठ घरफोड्या असे एकूण दहा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. अथणीचे पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर, उपनिरीक्षक कुमार हाडकर, ऐगळीच्या पोलीस उपनिरीक्षक जी. जी. बिरादार, कागवाडचे पोलीस उपनिरीक्षक जी. एस. उप्पार, अथणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. नागराज, ऐगळीचे सी. बी. सागनूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक विभागाच्या मदतीने अर्जुन ऊर्फ अर्जेंटला अटक करून 14 लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.









