बेळगाव-कोल्हापूर जिल्हाधिकारी-पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा : येत्या दोन दिवसात मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार
बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी मंगळवारी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक झाली. या बैठकीत बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी आंतरराज्य बससेवा लवकरच सुरळीत आणि पूर्ववत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे लवकरच आंतरराज्य बससेवा सुरळीत होणार आहे.
चित्रदुर्ग येथे घडलेल्या घटनेमुळे मागील चार दिवसांपासून आंतरराज्य बससेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा परिणाम दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळांवर झाला आहे. दरम्यान ठप्प झालेली आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवाय लवकरच ही बससेवा पूर्ववत होईल, असे संकेत देण्यात आले आहेत. शिवाय दोन्ही राज्यातील आंतरराज्य बससेवा पूर्ववत करण्यासाठी येत्या दोन दिवसात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील, असे सांगण्यात आले.
दोन्ही राज्यातील बसेस आणि वाहन चालकांवर हल्ले करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार आहे. कर्नाटक राज्यात बसेसवर हल्ला करणाऱ्यांवर यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील इतर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून बससेवेबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
‘त्या’ घटनेचा गृहमंत्र्यांनी मागविला अहवाल
बेळगावमध्ये परिवहन महामंडळाच्या बस कंडक्टरवरील हल्ला प्रकरणी अहवाल सादर करण्याची सूचना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. बेंगळूरमध्ये मंगळवारी पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले, बस कंडक्टरवरील हल्ला प्रकरण आणि कंडक्टरवर कोणत्या कारणावरून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता, याविषयी देखील अहवाल देण्याची सूचना उत्तर विभागाचे आयजीपी आणि बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांना दिली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील बससेवा सध्या ठप्प आहे. वातावरण पूर्वपदावर आल्यानंतर दोन्ही राज्यांतील बससेवा पूर्ववत होईल, असेही त्यांनी सांगितले.
परिवहन मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना घटनेविषयी दिली माहिती
परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी बेळगावमधील कंडक्टरवरील हल्ला प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिली आहे. बेंगळूरमधील मुख्यमंत्र्यांच्या ‘कावेरी’ या शासकीय निवासस्थानी रामलिंगारेड्डी यांनी सिद्धरामय्या यांची भेट घेऊन संपूर्ण अहवाल सादर केला. याप्रसंगी पोलीस महासंचालक अलोक मोहन यांनी देखील सिद्धरामय्या यांची भेट घेऊन बेळगावमधील घटनेसंबंधी माहिती दिली. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी सीमाभागात कडेकोड बंदोबस्त ठेवण्याची सूचना दिली. तसेच बसेस आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांशी चर्चा करण्याची सूचना राज्य सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना केली. तसेच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांशी चर्चा करण्याची सूचना अलोक मोहन यांना केली.









