महाराष्ट्रात आंदोलन : कर्नाटकच्या बसेस धावताहेत केवळ सीमाहद्दीपर्यंतच
प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनामुळे बेळगावातून जाणाऱ्या बसेस तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून बेळगाव परिवहनने हा निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या बसेस केवळ सीमाहद्दीपर्यंत धावत आहेत. त्यामुळे आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहेत. दरम्यान काही वाहनांवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे काहीकाळाकरिता बेळगाव परिवहनने महाराष्ट्रात धावणाऱ्या बसेस बंद ठेवल्या आहेत.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई यासह सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कुडाळ आदी ठिकाणी बसेस धावतात. मात्र महाराष्ट्रातील आंदोलनामुळे या साऱ्या बसेस ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. प्रवाशांना विनाकारण जादा पैसे देऊन खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.









