कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक शहरांकडे धावताहेत बस : प्रवाशांतून समाधान, लालपरी अद्याप ठप्पच
प्रतिनिधी /बेळगाव
मागील चार दिवसांपासून ठप्प झालेल्या आंतरराज्य बससेवेला शुक्रवारपासून पुन्हा प्रारंभ झाला. करवेच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातल्याने आंतरराज्य बससेवा बंद झाली होती. मात्र आता वाद काहीसा निवळल्यानंतर बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुणे आदी शहरांकडे बस धावत आहेत. कोल्हापूर बसस्थानक वगळता इतर सर्व बसस्थानकात कर्नाटकच्या बस दाखल होत आहेत.
मागील आठवडाभरात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आणि त्यानंतर करवेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या धिंगाण्यामुळे बससेवेवर परिणाम झाला आहे. दोन्ही महामंडळांच्या महसुलावर परिणाम झाला आहे. मात्र गुरुवारपासून बेळगाव आगारातून महाराष्ट्रातील काही शहरांकडे बससेवेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे सीमाभागातील प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. राजकीय वादग्रस्त विधानाचा बससेवेवर सातत्याने परिणाम होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नुकसान होवू नये, यासाठी खबरदारी म्हणून बससेवा थांबविली जात आहे. मात्र यामध्ये प्रवाशांची गैरसोय होत आहे. शिवाय दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे.
कोरोनाच्या संकटानंतर आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. विविध मार्गांवर अतिरिक्त बस पुरवून उत्पन्न वाढविले जात आहे. मात्र आंदोलन, संप आणि राजकीय वादग्रस्त विधानामुळे सातत्याने बससेवेवर परिणाम होत आहे. मुख्यमंत्र्यांनी जत, अक्कलकोट आणि सोलापूर जिल्ह्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर बससेवा विस्कळीत झाली होती. यापाठोपाठ करवेच्या कार्यकर्त्यांनी हिरेबागेवाडी टोल नाक्यावर आंदोलन छेडून महाराष्ट्राच्या वाहनांचे नुकसान केले होते. त्यानंतर सीमाप्रश्न पुन्हा चिघळला होता. याचा बससेवेवर मोठा परिणाम झाला. दरम्यान, महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि इतर कर्नाटकाच्या बसना काळे फासण्यात आले. दरम्यान, खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात धावणाऱ्या सर्व बस बंद केल्या आहेत. त्यामुळे मागील चार दिवसांत महाराष्ट्राची लालपरी बेळगावात आली नाही. केवळ सीमाहद्दीपर्यंत लालपरी येऊन थांबत आहे. तेथून पुढे कर्नाटकाच्या बसने किंवा खासगी वाहनाने प्रवाशांना बेळगाव गाठावे लागत आहे.
लालपरी बेळगावात कधी?
राजकीय वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रातील लालपरी ठप्प झाली आहे. मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र बस बेळगावात आली नाही. मात्र कर्नाटकाच्या बस महाराष्ट्रात पूर्ववतपणे सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या बस बेळगावात कधी येणार? असा प्रश्न पडला आहे. कोकणातून येणाऱ्या महाराष्ट्राच्या बस केवळ शिनोळी फाट्यापर्यंतच येत आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कणकवली आदी ठिकाणांहून येणाऱ्या बस सीमाहद्दीपर्यंतच धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
वाद निवळल्यानंतर बससेवा सर्वत्र पूर्ववत
महाराष्ट्रात बसेस सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर वगळता पुणे, नाशिक, मुंबई बसस्थानकात बस जात आहेत. कोल्हापुरात बाहेर प्रवाशांना उतरून बस धावत आहेत. वाद काहीसा निवळल्यानंतर बससेवा सर्वत्र पूर्ववत करण्यात आली आहे.
– के. के. लमाणी (विभागीय नियंत्रण अधिकारी)









